लघुउद्योगांच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देणार-शिवसेना नेते रामदास कदम
खेड : कोरोना संकटामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. काहिंना आपला व्यवसाय बंद करून गावची वाट धरावी लागली आहे. गावी आलेल्या तरूणांकडे सद्यस्थितीत ना नोकरी ना व्यवसाय त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अशा तरुणांनी आता धीर सोडण्याची गरज नाही. शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लघुउद्योग सुरु करून खेड दापोली आणि मंडणगड येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढला जाईल अशी माहिती माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शिवसेना नेते रामदास कदम हे नुकतेच दापोली मतदार संघाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मंडणगड, दापोली व खेड येथे बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शिवतेज आरोग्य सेवा सस्था कशा पद्धतीने लघुउद्योगांचे जाळे विणत आहे याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना ते
म्हणाले, सध्या कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नाहीत, तरीही मी मतदार संघाच्या दौऱ्यावर आलो आहे. कोरोनाच्या संकटामुळे नोकरी,व्यवसाय गमावून बसलेल्या युवकांच्या हाताला लघुउद्योगांच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणे हा या दौऱ्यामागचा एकमेव उद्देश आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मुंबई,पुणे यासारख्या मोठ्या औद्योगिक शहारांमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. जवळ जवळ सहा ते सात महिने आर्थिक बाजू लंगडी झाल्याने अनेकांच्या संसाराची घडी विस्कटली आहे. अशा युवकांना वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून मी माझे कर्तव्य समजतो, त्याच भावनेने मी आज मतदार संघाच्या दौऱ्यावर आलो आहे.
विकासाची कामे होत आहेत, ती होतच राहतील, निवडणुका येतील आणि जातील देखील पण आज खरी गरज आहे ती संसाराची विस्कटलेली घडी सारखी करण्याची. खरी गरज आहे ती नोकरी, व्यवसाय गमावून बसलेल्या तरुणांच्या हाताला काम देण्याची. या मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी या पुर्वीच रोजगार निर्मितीची घोषणा केली होती, त्याची सुरवात खेड व्हल्यू चैन या प्रकल्याने आता होणार आहे. या प्रकल्पासाठी शिवतेज आरोग्य सेवा संस्थेने दोन एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेकांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार असल्याने कोरोनामुळे निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघणार आहे.
शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून मतदार संघात सुरु करण्यात येणारे लघुउद्योग कोरोनाकाळात नोकरी, व्यवसाय गमावून बसलेल्या तरुणांसाठी वरदान ठरतील असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com