
रत्नागिरी जिल्ह्यातील वारसा पर्यटनाला चालना देणारा पथदर्शी उपक्रम निसर्गयात्री संस्था , रत्नागिरी व रत्नागिरी टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवाचे गोठणे येथे उत्साहात साजरा
जागतिक पर्यटन क्षेत्रात , पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांपैकी वारसा पर्यटन या घटकाचे योगदान ५५% पेक्षा अधिक आहे. भारत देशाचा विचार करता हे प्रमाण अधिक आहे . भारतातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांवर नजर टाकल्यास हे सहज लक्षात येईल. वारसा पर्यटन या घटकातून जगात कोट्यावधी रोजगार उभे राहिले आहेत आणि यात सातत्याने वेगाने भर पडत आहे . ही बाब वारसा पर्यटन त्यातून निर्माण होणारा सर्वंकष रोजगार व पर्यावरण पूरक शास्वत विकास यासाठी पुरेसे बोलले आहे. २७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आलेली सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा स्थळांची जपणूक ही संकल्पना वारसा स्थळांचे पर्यटन क्षेत्रातील महत्व अधोरेखित करते.
या पार्श्वभूमीवर २७ सप्टेंबर २०२० या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी जिल्ह्यातील वारसा पर्यटनाला चालना देणारा पथदर्शी उपक्रम निसर्गयात्री संस्था , रत्नागिरी व रत्नागिरी टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवाचे गोठणे येथील स्थानिक ग्रामस्थ आणि रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाचे अधीक्षक श्री देशमुख यांच्या उपस्थितीत देवाचे गोठणे गावातील वारसा स्थळांवर साजरा करण्यात आला.
यावेळी निसर्गयात्री संस्थेचे श्री सुधीर रिसबुड, श्री धनंजय मराठे, श्री ऋत्विज आपटे रत्नागिरी टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशनचे श्री सुहास ठाकुरदेसाई, श्री करंदीकर, श्री निलेश मुळे, श्री विजय पाटील तसेच देवाचे गोठणे गावातील श्री नीलेश आपटे, उपसरपंच श्री जाधव, सदस्य श्री लिंगायत व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्याला खूप मोठा नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. पुरेशी माहिती व त्याचे महत्व न तसेच कळल्याने हा अनमोल ठेवा आज दुर्लक्षित अवस्थेत आहे . निसर्गयात्री संस्था सदस्य स्वखर्चाने यावर गेली अनेक वर्षे यावर काम करीत आहेत . त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक वारसा स्थळांवर प्रकाशझोत टाकला आहे . कोकणातील प्रागैतिहासिक कालखंडातील अनेक ठिकाणे शोधून जगसमोर आणली आहेत. त्याचबरोबर या वारसा स्थळांचे सुयोग्य पद्धतीने जतन संवर्धन व्हावे म्हणून स्वखर्चाने त्यांचे सर्वोतोपरी प्रयत्न चालू आहेत. त्यांच्या या कार्यातून रत्नागिरी जिल्ह्याचे नाव आज जगाच्या पाठीवर पोचले आहे . परिणामस्वरूप विविध प्रांतातील, देशातील पर्यटक, अभ्यासक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भेटीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत आहेत.
वारसा स्थळाची परिपूर्ण माहिती करून घेणे, त्याबाबत स्थानिक जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे, स्थानिक लोकसहभाग वाढविणे, जगासमोर अचूक व विश्वासार्थ महिती पोचविणे या बाबी वारसास्थळांची सुयोग्य जपणूक करण्यासाठी प्राथमिक आणि महत्वाचे अंग आहे.
या गोष्टींचा एक भाग आणि सुरवात म्हणून २७
सप्टेंबर २०२० रोजी जागतिक पर्यटन दिनी देवाचे गोठणे येथे प्रत्यक्ष जाउन तेथील वारसा स्थळे ४०० वर्षांचे भार्गवराम मंदिर, अष्मयुगीन कातळ – खोद – चित्र , जगातील द्वितीयक जांभा दगडात चुंबकीय विस्थापन दर्शविणारी जागा अर्थात निसर्गातील चमत्कार , परिसरातील जैवविविधता याची समग्र माहिती व महत्व विषय तज्ञाकडून समजून घेण्यात आले. तसेच भवितव्यातील या परिसराचा विकास या बाबत चर्चा करण्यात आली.
या परिसरातील वारसा स्थळांची माहिती पर्यटकांना व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरण्यात येतात असे प्रातिनिधिक चिन्हाचा वापर करत तयार करण्यात आलेला दिशादर्शक फलक ग्रामस्थानां पुढील वापरासाठी रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाचे अधीक्षक श्री देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. व अशा प्रकारची प्रातिनिधिक चिन्हे सर्वत्र वापरण्यात यावी यासाठी आवाहन करण्यात आले .
निसर्गयात्री संस्था रत्नागिरी आणि रत्नागिरी टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशन यांनी उचललेले हे पाऊल रत्नागिरी जिल्हा वारसा पर्यटन विकास व त्यायोगे रोजगार निर्मिती व पर्यावरण शास्वत विकासाची मुहूर्तमेढच आहे .
www.konkantoday.com