वांद्रीतील डॉक्टरला मारहाण करून पळणार्‍याला पोलिसांनी पकडले

संगमेश्वर : तालुक्यातील वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवकुमार फासके यांना तरुणाने मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री 10 वा. च्या सुमारास घडली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.  फारुख जहांगीर लसकर (रा. मालाड, पूर्व मुंबई) याने ही मारहाण केली.  मारहाण केल्यानंतर तेथून पोबारा करणार्‍या फारूक लसकर याला संगमेश्वर पोलिसांनी सापळा रचत अटक केली.
डॉ. शिवकुमार फासके हे वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रातून काम आटोपून रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बावनदी मार्गे देवरूखला जात होते. तळेकांटे दरम्यान त्यांना एक तरूण चालताना दिसला. त्याने गाडीला हात दाखवताच डॉ. फासके यांनी गाडी थांबवून त्याला गाडीत घेतले आणि पुढील प्रवासाला जात असताना चहा पिण्यासाठी त्यांनी गाडी बावनदी येथे चहा घेण्यासाठी टपरीजवळ थांबले. त्यालाही चहा दिला. मात्र, चहा पित असतानाच त्या तरुणाने  डॉ. फासके यांच्या चारचाकी गाडीची चावी मागितली. डॉक्टरांनी चावी कशासाठी हवी आहे? असे विचारले असता फारूकने  डॉ. शिवकुमार फासके यांना हाताने तसेच दगडाने जोरदार मारहाण केली.  त्यानंतर फारूक याने  तेथून पोबारा केला.
 संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्यासह पोलिस कर्मचारी कांबळे, देशमुख, पंदेरे, वरगळे, गोंधळे, चालक तेरवणकर यांच्यासह ग्रामस्थ अमित मयेकर, सिद्धेश मयेकर, ऋषिकेश पाटील, रोहित पाटील, मारुती नागवेकर, कौस्तुभ नागवेकर, परेश पाटील यांनी सलग तीन तास जंगल भागात जाऊन शोध घेतला व मारहाण करणार्‍या फारूक  लसकर याला पकडले. डॉ. शिवकुमार फासके यांची पत्नी डॉ. कविता फासके यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button