नारायण राणे ,उदय सामंत व शेखर निकम यांच्या निवडणूक संदर्भातील तीन याचिका कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर फिरत्या खंडपीठाचे (सर्किट बेंच) कामकाज सोमवारपासून सुरू झाले असून, निवडणुकीच्या संदर्भातील कोकणातील तीन महत्त्वाच्या याचिका या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची निवडणूक २०२४ मध्ये झाली होती. या निवडणुकीत भाजपचे नारायण राणे आणि शिवसेनेचे विनायक राऊत आमनेसामने होते. निवडणूक प्रचार संपल्यानंतरही राणे यांचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत होते, त्यांच्या निवडणूक चिन्हाचा प्रचार करत होते तसेच मतदारांना धमकावत होते, असा आरोप राऊत यांनी केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आता कोल्हापूर खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली आहे.

२०२५ मधील चिपळूण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. यामध्ये आमदार शेखर निकम यांनी ग्रामपंचायतींना संगणक वाटप केले, मानहानीकारक भाषण केले, अशा विविध मुद्द्यांवर प्रशांत यादव यांनी दाखल केलेला खटला कोल्हापूरच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, रत्नागिरी विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार ज्योतिप्रभा पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका देखील कोल्हापूर खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. रत्नागिरी मतदार संघातील मतदार यादीतील गंभीर त्रुटी, ईव्हीएम पारदर्शकता यावर तब्बल १७५० पानांची याचिका त्यांनी दाखल केली आहे. विजयी उमेदवार उदय सामंत यांची निवड रद्द करावी व त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवावे, अशी मागणी ज्योतिप्रभा पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button