
दरोडाप्रकरणातील मास्टरमाइंड लवकरच गजाआड; खेड पोलिसांचा विश्वास
खेड :स्वस्त किंमतीत दोन किलो सोने देण्याचे आमीष दाखवत ५९ लाखांच्या दरोडा प्रकरणातील मास्टर माईंड किशोर पवार याच्या मुसक्या आवळण्यासाठी खेड पोलिसांनी मुंबईत फिल्डिंग लावली असून मास्टर माईंड किशोर यांच्यासह फरार असलेले अन्य आरोपी लवकरच गजाआड असतील असा विश्वास खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी व्यक्त केला आहे.
१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास किशोर पवार याने वेरळ येथील अमर जड्याळ व त्याच्या काही मित्रांना दोन किलो सोने घेण्यासाठी महामार्गावरील उधळे गावच्या हद्दीतील जंगलात नेले होते. याठिकाणी पोहचल्यावर किशोर व त्याच्या अन्य काही साथीदारांनी सोने खरेदीसाठी आलेल्या जड्याळ व त्याच्या मित्रांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि सोने खरेदीसाठी आणलेली ५९ लाख रुपयांची रोकड घेऊन पलायन केले.
या प्रकारकणातील तीन आरोपीना खेड पोलिसांनी त्याच दिवशी दस्तुरी आणि सुकीवाली येथून ताब्यात घेतले तर आणखी पाच आरोपीना चार दिवसांनी रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील जंगलातून ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांनी २ लाख रुपयांची कॅश, १ अल्टो मारुती कार, आणि पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. त्यांनंतर पोलिसानी आपला मोर्चा मास्टर माईंड किशोर पवार आणि अन्य फरार आरोपींकडे वळवला आहे. म्हसळा येथील जंगलातून अटक करण्यात आलेली विक्रम वसंत चव्हाण, सिद्धेश विठ्ठल पवार, नरेश वसंत चव्हाण, विजय गौरीशंकर भगत, प्रमोद उर्फ बबल्या रामचंद्र चव्हाण, दीपक माणिक चव्हाण, अंकुश पंढरीनाथ पवार, मनोज जाधव हे पनवेल पर्यंत किशोर पवार याच्या बरोबरच होते. यांना म्हसळा येथे जाऊन लपण्यास सांगून किशोर आणि आणखी चारजण हे मुंबईकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्याने पोलिसांनी पनवेल ते मुंबई दरम्यानचे सर्व सीसी टीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली आहे. हेच फुटेज पोलिसांना या प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर पवार याच्या प्रयन्त घेऊन जाण्यास मदत करतील असा विश्वास पोलिसांचा आहे.
खेडचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या नेतृत्वाखालील दोन पोलीस पथकांनी मुंबई येथेच तळ ठोकून आहेत. मुख्य सूत्रधार किशोर पवार मूळचा दापोली तालुक्यातील हर्णे येथील आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी हर्णे येथेही लक्ष ठेवण्यात आले आहे.
www.konkantoday.com