धामणदेवी येथे वर्षभरापूर्वी झालेल्या चोरीप्रकरणातील सुमारे ३ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने खेड पोलिसांनी संबंधितास परत केले
खेड: तालुक्यातील धामणदेवी येथे वर्षभरापूर्वी झालेल्या चोरीप्रकरणातील सुमारे ३ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने खेड पोलिसांनी संबंधितास परत केले. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कार्यवाही केली.
तालुक्यातील धामणदेवी येथील इब्राहीम अब्दुल्ला फिरफिरे यांच्या घरी वर्षभरापूर्वी चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी केला. गोपनीय बातमीदारांकडुन आरोपीचा ठावठिकाणाबाबत माहिती मिळवून त्यांनी आरोपीला गजाआड केले. याप्रकरणी अजिंक्य मोहिते, दिपक लिल्हारे, सैफ काझी या तिघांना या तिघा चोरट्याना अटक करण्यात आली होती.
आरोपींनी पोलीस चौकशीत चोरी केल्यानंतर ठाणे जिल्हयातील डोंबिवलीमध्ये काही दिवस वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीत आरोपीनी काही सोन्याचे दागिने डोंबिवली येथील एका सोनाराकडे गहाण ठेवल्याचे व काही सोन्याचे दागिने त्यांच्याच एका
मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी पथकासहित तपासासाठी डोंबिवलीत हजर झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सोनाराचा व आरोपींच्या
मित्राचा शोध घेतला. त्याच्याकडुन चोरीस गेलेले सोन्याचे सर्व दागिने हस्तगत करण्यात आले. यामध्ये सोन्याचा एक नेकलेस, सोन्याची कर्णफुले एक जोडी, सोन्याची एक बाली जोडी, सोन्याच्या दोन अंगठ्या या दागिन्यांचा समावेश आहे.
या गुन्हयातील पोलिसांनी हस्तगत केलेले सोन्याचे दागिने फिर्यादीला सुपुर्द करावेत, असा खेड न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मंगळवारी
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील
व पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याहस्ते फिर्यादीला सोन्याचे दागिने परत करण्यात आले.
www.konkantoday.com