दापोली तालुक्यातील आंजर्ले नळपाणी योजनेचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते शुभारंभ
खेड : दापोली विधान सभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या दापोली तालुक्यातील आंजर्ले गावच्या नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. ८१ लाख रुपयांच्या शासकीय निधीतून करण्यात येणाऱ्या या नळपाणी योजनेमुळे आंजर्लेवासीयांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
दापोली तालुक्यातील आंजर्ले ग्रामस्थांचा पाणी प्रश्न निकाली निघावा यासाठी योगेश कदम यांनी आमदार होण्यापूर्वीच प्रयत्न सुरु केले होते. राज्याचे तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या माध्यमातून त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आणि या नळपाणी योजनेला मंजुरी मिळून या कामासाठी आवश्यक असलेला ८१ लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर झाला.
काही महिन्यांपूर्वीच या कामाची वर्कऑर्डर निघाली होती. परंतु मार्च महिन्यापासून निर्माण झालेली कोरोना परिस्थिती आणि जूनमध्ये झालेले चक्रीवादळ त्यामुळे नळपाणी योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नव्हती.
तांत्रिकी अडचणीमुळे नळपाणी योजनेचे रखडलेले काम लवकर सुरु व्हावे यासाठी आमदार योगेश कदम यांनी पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन या योजनेबाबत पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर आमदार कदम यांच्या प्रयत्नांना यश आले आणि या नळपाणी योजनेच्या कामाचा त्यांच्याच हस्ते शुभारंभ करण्यात आला. या नळपाणी योजनेमुळे आंजर्ले गावच्या ग्रामस्थांचा गेल्या अनेक वर्षाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे.
या प्रसंगी माजी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, माजी बांधकाम व आरोग्य सभापती चंद्रकांत उर्फ आण्णा कदम, दापोली शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप सुर्वे, तालुका संघटक उन्मेष राजे, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश शेठ, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा झगडे, सुनील दळवी, शिवसेना शाखा प्रमुख चेतन सुर्वे, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
www.konkantoday.com