आमदार योगेश कदम यांची कळंबणी कोविड रुग्णालयाला भेट;कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना

खेड : खेड येथील कळंबणी कोविड रुग्णालयाला भेट देऊन आमदार योगेश कदम यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला. या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक कोरोना रुग्णावर योग्य प्रकारे उपचार झाले पाहिजेत, यासाठी आवश्यक ती औषधें, यंत्रसामुग्री, बेड्स, उपलब्ध करून दिले जातील. परंतु इथे आलेल्या एकही रुग्णावर उपचारांसाठी खासगी कोविड रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये अशा सक्त सूचना यावेळी आमदार कदम यांनी येथील आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती फुले या देखील उपस्थित होत्या.
गेल्या काही दिवसांमध्ये खेडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमालीची वाढली आहे. वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने काहीजणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार योगेश कदम यांनी कळंबणी कोविड रुग्णालयाला भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. कोविड रुग्णालय आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना करताना योगेश कदम म्हणाले, इथे उपचारांसाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत आणि योग्य प्रकारे उपचार मिळायला हवेत. त्यासाठी लागणारी औषधे, इंजेक्शन कमी पडत असतील तर ती उपलब्ध करून दिली जातील इथे जनरल फिजिशिअन आणि आवश्यक असलेला स्टाफ देण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्या नुसार कार्यवाही होईल मात्र इथे सुविधा नाही असे कारण देत कुणालाही खासगी कोविड रुग्णलयात पाठवण्यात येऊ नये.
कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये यासाठी आमदार योगेश कदम स्वतः जातीने लक्ष देत आहेत. दापोली, मंडणगड आणि खेड या तिन्ही तालुक्यातील रुग्णांसाठी मुबलक औषधसाठा, ऑक्सिजन बेड्स, उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अतिगंभीर कोविड रुग्णावर तात्काळ उपचार केले जावेत यासाठी कळंबणी कोविड रुग्णालयात २० बेड्सचा आयसीयू वॉर्ड सुरु करण्यात आला आहे. शिवाय लवेल येथील घरडा कोविड केअर सेंटर येथे कोविड रुग्णांसाठी आणखी ५० बेड्स वाढविण्यात आले आहेत. कळंबणी कोविड रुग्णालयात पूर्वी ४५ बेड्स होते आता ही संख्या ६५ झाली आहे. घरडा कोविड सेन्टर लवेल येथेही पूर्वी १२० बेड्स होते. आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने यामध्ये आणखी ५० बेड्सची भर पडली असल्याने ही संख्या १७० झाली आहे.
कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. औषधें आणि इंजेकशन्स कमी पडत असतील तर आणखी दिली जातील परंतु एकाही रुग्णाच्या नातेवाईकाला बाहेरून औषधें आणून देण्याची सक्ती करू नये, अशी सूचनाही आमदार योगेश कदम यांनी केली आहे. कोरोनाबाधितांवर योग्य प्रकारे उपचार होतात की नाही हे पाहण्यासाठी मी २४ तास उपलब्ध आहे. रुग्णालयात कोणालाही उपचारांबाबत समस्या निर्माण होत असेल तर त्या रुग्णाने किंवा नातेवाईकाने थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहनही आमदार कदम यांनी यावेळी केले आहे.
यावेळी, शशिकांत चव्हाण, प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार, प्राजक्ता घोरपडे, उपसभापती जीवन आंब्रे, रामचंद्र आईनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य महीपत पाटणे आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button