कशेडी बोगद्याचे काम प्रगतीपथावर ; काम एप्रिल २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून खोदण्यात येत असलेल्या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून कामाचा वेग पाहता बोगद्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. महामार्गावरील ३.४४ किलोमीटर लांबीचा या बोगद्यामुळे नागमोडी वळणाचा अवघड कशेडी घाट काही मिनिटात पार करता येणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट हा अतिशय धोकादायक घाट मानला जातो. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत ७ किलोमीटर आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीत ९ किलोमीटर असा एकूण १६ किलोमीटरचा घाट पार करताना चालकांचा कस लागतो. हा घाट चढताना किंवा उतरताना चालकाचे जरा जरी लक्ष विचलित झाले तरी कपाळमोक्ष ठरलेलाच. त्यामुळे कशेडी घाटाची सगळ्यांच्याच मनात कमालीची भीती. पावसाळ्यात तर या भीतीत आणखीनच भर पडते. निसरड्या झालेल्या रस्त्यावरून अवजड वाहने घसरून अपघात होणे किंवा मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे या घटना या घाटात कायम घडतच असतात.
घाटात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या अपघातांना आळा बसावा या दृष्टीने नागमोडी वळणाच्या घाटाला पर्याय म्हणून बोगदा खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०१८ साली अभियांत्रिकी प्रॉक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन यांच्यासोबत ४४१ कोटींचा करार केला. या करारानुसार बोगद्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले असून ही कंपनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी भुयारी मार्ग तयार करत आहे. कंपनीशी झालेल्या करारात ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत खवटी गावाच्या हद्दीतून सुरु होणार हा भुयारी मार्ग रायगड जिल्ह्यातील पोलादपूर भोगाव खुर्द या गावाजवळ पुन्हा महामार्गाला मिळणार आहे. खेड तालुक्यातील कशेडी येथे गेल्यावर्षी बोगदा खोदण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते या कामाचे उदघाटन करण्यात आले होते. सद्यस्थिती खेड बाजूकडून ७३० मीटर अंतराचा तर पोलादपूर तालुक्यातील भोगाव येथून ५०० मीटर चा भुयारी मार्ग तयार झाला आहे. दोन्हीही बाजूने खोदाईचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याने २०२१ वर्षाच्या प्रारंभी हा भुयारी मार्ग पुर्णत्वास जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट हा कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात या घाटाततून दिसणारे निसर्ग सौन्दर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे मात्र अवघड वळणांमुळे या घाटात होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी असल्याने हा घाट महामार्गाववरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि चालकांसाठी शापित ठरला आहे. सध्या या मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र या अवघड आणि नागमोडी वळणांच्या घाटात चौपदरीकरण शक्य नसल्याने घातला पर्याय म्हणून भुयारी मार्ग तयार कारण्यात येत आहे. या कामासाठी ४४१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
३.४४ किलोमीटरच्या भुयारी मार्गात आपत्कालामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन सुविधेचे एक भुयारदेखील समाविष्ट असून पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किमी. अंतराच्या टप्प्यामध्ये दोन्ही भुयारी मार्गांना जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटीचा भुयारी मार्ग तयार झाला आहे, भुयारी मार्गावर एखादा अपघात झाला तर अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्यासाठी किंवा एखाद्या वाहनाला यु टर्न घ्यायचा असेल तर या कनेक्टिव्हिटी भुयारीमार्गाचा उपयोग होणार आहे. यासोबतच आपतकालामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन सुविधा देखील यामध्ये समाविष्ट आहे.
२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये खेड तालुक्यातील खवटी या गावाजवळ सुरू झालेले हे काम एप्रिल २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांच्याकडून उपलब्ध झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button