
आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने खेडमध्ये खासगी कोविड सेंटर
खेड : खेड दापोली आणि मंडणगड या तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ आणि आयसीयू सारखी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दापोली विधान सभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने खेड येथे खासगी कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली असून या कोरोना सेंटरमुळे कोरोनाबाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करणे शक्य होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर रत्नागिरीत कोरोनाचा कहर पाहावयास मिळत आहे. खेड आणि दापोली या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या दिवसेंदेवस नवा उच्चांक गाठत आहे. खेड दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांमध्ये आय.सी.यू सेवा उपलब्ध नसल्याने कोरोना बाधित रूग्णांची हेळसांड होत होती. आयसीयू सुविधेसाठी रुग्णाला मुंबई किंवा पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये घेऊन जावे लागत होते. या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येणार खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नव्हता . सर्वसामान्यांची होणारी हि आर्थिक अडचण गांभीर्याने घेत दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी खेडमध्ये अत्याधुनिक कोविड सेंटरच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून खेमध्ये आता अत्याधुनिक खासगी कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.
खेड येथे सुरु करण्यात आलेल्या खासगी कोविड सेंटरला आमदार कदम यांनी नुकतीच भेट देऊन या कोविड सेंटरची प्रत्यक्ष पाहणी केली. याठिकाणी करण्यात येणाऱ्या प्रत्येक उपाययोजनांचा अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्याना आवश्यक त्या सूचनाही केल्या. यावेळी प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी सगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके, नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. केतन कदम, आय.सी.यू, डी.सी.सी. सुरू करणारे एम. डी. डॉ. पवार, सर्जन डॉ. प्रेमसागर जाधव उपस्थित होते.
www.konkabtoday.com