
रत्नागिरी जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 लसीकरण
12 ते 14 वयोगटातील साधारणत: सहावी ते आठवीत शिकणाऱ्या मुलांसाठी दिनांक 21.03.2022 पासून कोविड-19 लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 70 हजारच्या वर लाभार्थींना कोविड-19 लस आपल्या आई-वडिलांप्रमाणे देण्यात येणार म्हणून मुलांमधून आनंद व्यक्त होत आहे. कोविड-19 लसीकरणाचा आठवा टप्पा सुरू करण्यात येत आहे. या टप्प्यात 12 ते 14 वयोगटातील शाळकरी मुलांचे कोविड-19 लसीकरण करण्यात येणार आहे. आत्तापर्यंतच्या सात टप्प्यात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनची लस वापरण्यात आली आहे. परंतु आता या मुलांसाठी मात्र कोरबेवॅक्स लस उपलब्ध करण्यात आली आहे. या लसीच्या एका व्हायलमध्ये (बाटली) 20 डोस आहेत. एका इंजेक्शनमधून 0.5 मि. ली. इतका डोस दिला जाणार आहे. कोव्हॅक्सिनप्रमाणेच कोरबेवॅक्स लसीचे दोन डोसमधील अंतर चार आठवडेच राहणार आहे. 15 मार्च 2008 ते 15 मार्च 2010 मध्ये जन्मलेल्या सर्व मुलांना ही लस घेता येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर ही लस देऊन या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. लसीचे नाव कोरबेवॅक्स- डोसचे प्रमाण 0.5 मिली एका बाटलीमध्ये 20 डोस आहेत. तर या लसीचा दुसरा डोस 4 आठवड्यानंतर दिला जाईल. कोविड-19 लसीकरणाचे टप्पे - रत्नागिरी जिल्हयामध्ये खालीलप्रमाणे आजपर्यंत घेण्यात आले.
1) हेल्थ केअर वर्कर यांना 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरणाचा पहिला टप्पा घेण्यात आला.
2) फ्रंट लाईन वर्कर यांना 2 फेब्रुवारी 2021 रोजी दुसरा टप्पा घेण्यात आला.
3) 45 वयोगटावरील सहव्याधी व 60 वयोगटासाठी 1 मार्च 2021 रोजी तिसरा टप्पा घेण्यात आला.
4) 45 वयोगटावरील सर्व नागरिकांना 1 एप्रिल 2021 रोजी चौथा टप्पा घेण्यात आला.
5) 18 ते 44 वयोगटासाठी 1 मे 2021 रोजी पाचवा टप्पा घेण्यात आला.
6) 18 वयोगटावरील सर्व नागरिकांना 21 जून 2021 रोजी सहावा टप्पा घेण्यात आला.
7) 15 ते 18 वयोगटातील मुलांचे 03 जानेवारी 2022 रोजी सातवा टप्पा घेण्यात आला. जिल्हयामध्ये आजपर्यंत एकूण कोविड-19 लसीकरणाची पहिल्या डोसची मात्रा 1053729 देण्यात आली असून, हे प्रमाण 97.40 टक्के आहे. व दुसऱ्या डोसची मात्रा 878020 असून हे प्रमाण 81.16 टक्के आहे. अशी एकूण 1931749 लसींच्या मात्रा देऊन नागरिकांना पूर्णपणे सुरक्षित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सन 2007 वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले पात्र (15 ते 18 वर्षे वयोगटातील) पहिल्या डोसची मात्रा 49347 लसीच्या मात्रा देण्यात आली असून हे प्रमाण 68.78 टक्के असून, दुसऱ्या डोसची मात्रा 34631 असून हे प्रमाण 48.27 टक्के आहे. जिल्ह्यासाठी 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी 20400 डोस उपलब्ध झाले आहेत. दिनांक 21 मार्च 2022 पासून कोविड-19 लसीकरणाला जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात येत आहे असे डॉ.अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी सांगितले आहे. कोविड-19 लसीकरण आपल्या मुलांचे करुन, नागरिकांनी चांगला प्रतिसाद देण्याचे आवाहन मा.विक्रांत जाधव अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी व मा.उदयजी बने उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य व बांधकाम समिती, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी नागरिकांना केले आहे.
www.konkantoday.com