
भा.ज.पा. जिल्हा रत्नागिरीच्या नवनियुक्त कार्यकारणीची पहिली जिल्हा कार्यकारणी पहिली वेब मीटिंग संपन्न.
रत्नागिरी दक्षिण भाजपाची पहिली जिल्हा कार्यकारिणीची सभा आज वेबेक्सच्या माध्यमातून सकाळी ११.०० वाजता घेण्यात आली. वेबेक्सचे ॲप वापरत पहिल्यांदाच जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस “सेवा सप्ताह” म्हणून साजरा करण्याचे भाजपाने ठरवले असून या सेवा सप्ताहाचे कार्यक्रम ठरवण्यासाठी तसेच “पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती” २५ सप्टेंबर रोजी असल्याने त्या अनुषंगाने कार्यक्रम ठरवण्यासाठी तसेच २ ऑक्टोबर “गांधी जयंती” अनुषंगाने विविध कार्यक्रम ठरवण्यासाठी जिल्हा बैठक झाली.
सेवा सप्ताहात प्रत्येक मंडलात “सेवा सप्ताह” त्या-त्या मंडलाच्या तालुका अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली साजरा करणे. त्यामध्ये कोव्हीड रुग्णांना फळे वाटप, गरजूंना चष्मे वाटप, वृक्षारोपण, रक्तदान आदी कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच ‘मोदीजींचे कार्य’ या विषयावर एक “वेबेनॉर” आयोजित करून समाजातील मान्यवर घटकांना या “वेबेनॉर” मध्ये समाविष्ट करून घेण्याचे प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. “पंडित दीनदयाळ उपाध्याय” यांच्या २५ सप्टेंबर जयंती निमित्ताने भाजपा पदाधिकारी जिल्हा ते बूथ समिती सदस्यांच्या घरावर भाजपा ध्वज लावण्यात येणार असून पंडितजींच्या प्रतिमेचे पूजन प्रत्येक बुथवर करण्याचे निश्चित करण्यात आले. गांधी जयंती निमित्ताने “आत्मनिर्भर भारत” अभियानांतर्गत “आत्मनिर्भर पॅकेज” बाबत माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे अभियान राबवण्यात येणार आहे. या सर्व सेवा सप्ताहाचे प्रमुख म्हणून राजेश सावंत जिल्हा संघटन सरचिटणीस यांना नियुक्त करण्यात आले असून विविध समित्या घोषित करून पूर्ण नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.
मराठा आरक्षणाबाबत महाआघाडी शासनाचे दुर्लक्ष–
‘मराठा आरक्षणा’ संदर्भात महाआघाडी शासनाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे आजची स्थिती आली. मराठा बांधवांना आरक्षणाचा लाभ प्राप्त करून देण्याची सद्यस्थितीत जबाबदारी महाआघाडी शासनाची आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मा.मुख्यमंत्री महोदयांची वक्तव्य फसवी आहेत. मा.देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भा.ज.पा. शासनाने अभ्यासपूर्ण प्रयत्न करून आरक्षणाचा निर्णय केला. मात्र महाआघाडी शासनाने दुर्लक्ष केल्याने आत्ताची स्थिती उद्भवली. शासनाच्या या कार्यपद्धतीचा धिक्कार जिल्हा बैठकीत करण्यात आला. मराठा आरक्षणा संदर्भात भाजपाची भूमिका जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अशोक कदम यांनी मांडली आणि मराठा युवकांचे भवितव्य घडवण्यासाठी हे आरक्षण अबाधित ठेवण्याची जबाबदारी महाआघाडी शासनाने घेतलीच पाहिजे असे निक्षून प्रतिपादीत केले.
आरोग्य क्षमता दुप्पट करा. –
रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य अव्यवस्थेबाबत जिल्हा कार्यकारिणीने असमाधान व्यक्त करत अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले व कोव्हीड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात आत्ताच्या क्षमतेच्या दुप्पट क्षमतेची व्यवस्था आवश्यक असल्याने तशी व्यवस्था प्रशासनाने तात्काळ उभारावी अशी मागणी करण्यात आली. रत्नागिरीसाठी अतिरिक्त ऑक्सिजन बेड असलेली व्यवस्था युद्ध पातळीवर निर्माण करण्यात यावी अशी मागणी करणारा ठराव सभेत करण्यात आला. कोव्हीडच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा पर्याप्त राहतील तसेच आवश्यक औषधे, इंजेक्शन्स आणि अन्य आरोग्य सुविधा पर्याप्त प्रमाणात ठेवण्याची व्यवस्था शासनाने करावी अशी मागणी करणारा ठराव करण्यात आला.
आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करा
आरोग्य विभागात प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्डबॉय व अन्य कर्मचारी वर्गाची तात्काळ भरती करण्यात यावी अशी मागणी करणारा ठराव सभेत करण्यात आला.
अमानुष वागणुकीचा निषेध –
महाराष्ट्रात “निवृत्ती नेव्ही” अधिकाऱ्यांवर शिवसैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध या सभेत करण्यात आला. शिवरायांचे नाव घेऊन राज्य करताना ज्येष्ठ नागरिकांजवळ त्यातही “निवृत्त नेव्ही” अधिकाऱ्याला मारहाण करणे हा प्रकार अमानुष असून ही मनमानी प्रवृत्ती सत्तेची धुंदीदर्शक आहे असे स्पष्ट करत या मारहाणीचा निषेध करण्यात आला.
“कंगना राणावत” या पुरस्कार प्राप्त महिले संदर्भाने सुरू असलेले शिवराळ, असभ्य वर्तन पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. एखाद्या विचाराचा विरोध अशा असभ्य पद्धतीने होणे त्यातही महिले संदर्भात चाललेले वर्तन याचा भाजपा रत्नागिरी धिक्कार करत आहे.
ढिसाळ यंत्रणेचा धिक्कार –
पालघर मधील साधूंना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींविरुद्ध ९० दिवस होऊनही चार्जशीट दाखल झाली नाही परिणामी आरोपींना जामीन मिळाला ही शासकीय चालढकल असून जाणीवपूर्वक तपास यंत्रणा ढिसाळपणा करीत आहे या गोष्टीचा धिक्कार सभेमध्ये प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. बाबासाहेब परुळेकर यांनी केला.
सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी कोव्हीड – १९ च्या पार्श्वभूमीवर काळजी घेत पक्षांने ठरवलेले कार्यक्रम एक टीम म्हणून सामूहिक प्रयत्नांनी यशस्वी करावेत या कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क वाढवत संघटना मजबूत करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले.
सभेला सचिन वहाळकर, सौ.ऐश्वर्या जठार, ॲड. कदम, ॲड. परुळेकर सर्व मंडलांचे तालुकाध्यक्ष, विविध मोर्चा, आघाड्या यांचे अध्यक्ष, संयोजक यांचेसह बहुसंख्य जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. राजेश सावंत जिल्हा सरचिटणीस यांनी सभेचा समारोप आभार प्रदर्शन करून केला.
www.konkantoday.com