
चिपळूणमध्ये वीज मीटरमध्ये छेडछाड करून दहा हजाराची वीज चोरी
चिपळूण शहरातील गोवळकोट रोडवरील लतिफा अपार्टमेंट येथे एका तरुणाने वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २८ जून ते १३ नोव्हेंबर २०२५ या दीर्घ कालावधीत झालेल्या या चोरीमुळे महावितरण कंपनीचे ₹१०,१७० इतके आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी शनिवारी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव अशफाक-ए-गफर मेमन (वय ४०, रा. लतिफा अपार्टमेंट, गोवळकोट रोड) असे आहे. या प्रकरणाची तक्रार महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता नितीन शंकर कांबळे (५१, पाग-चिपळूण) यांनी नोंदवली आहे.
महावितरणच्या तपासणीदरम्यान असे निष्पन्न झाले की, अशफाक मेमन याने वीज मीटरच्या मागील बाजूस ड्रिलने छिद्र पाडून त्यामध्ये तांब्याची वायर ‘लूप’ करून टाकली होती. या छेडछाडीमुळे मीटरची वीज मोजणी कृत्रिमरीत्या कमी वेगात होत असल्याचे कर्मचाऱ्यांना आढळले.
तपासात समोर आले की, या पद्धतीने मेमन याने ९५१ युनिट वीज चोरी केली असून, त्यामुळे महावितरणला ₹१०,१७० चे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर सहाय्यक अभियंता नितीन कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चिपळूण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.




