कोविड योद्ध्यांच्या मुलींना
एस एन डी टी विद्यापिठाच्या प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक देणार प्रथम वर्ष शुल्क परत,एक अभिनव उपक्रम: लाभ घेण्याचे आवाहन

खेड: कोविड -१९ ने सभोवती अनिश्चिततेचे वातावरण तयार केले आहे. या परिस्थितीत देखील मुलींची शैक्षणिक वाटचाल थांबू नये म्हणून मुंबईतील एस एन डी टी विद्यापिठाच्या प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक विद्यालयाच्या वतीने कोविड योध्याच्या मुलींना प्रथम वर्षाच्या शुल्क प्रतिपूर्ति करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ दहा विद्यार्थनीना मिळणार असून त्यासाठी सम्पर्क साधण्याचे आवाहन विद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
कोरोना साथीच्या आजारामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे तर आर्थिक पेचप्रसंगातून देखील अनेक कुटुंब जात आहेत. या कठीण परिस्थितीत काही लोक असे आहेत आहेत समाजासाठी, या आजारांमुळे पीडित लोकांसाठी चौवीस तास काम करत आहेत आणि म्हणूनच त्यांना आपण कोविड -१९ योद्धे म्हणतो. पी व्ही पॉलिटेक्निक, एसएनडीटी महिला विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक विभाग तर्फे शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी या कोविड -१९ योद्धय्यांच्या मुलींना साठी एक वर्षांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ति करण्यात येणार आहे.
शासनाच्या अनुदानित अभ्यासक्रमातील पी. व्ही. पॉलिटेक्निक, एसएनडीटी महिला विद्यापीठातील डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक कोर्सच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी प्रवेश घेणार्‍या किमान दहा पात्र विद्यार्थिनींना ही शुल्क प्रतिपूर्ती देण्यात येईल. ह्या योजनेबद्दल विभागप्रमुख दिनेश गिरप म्हणाले, कोविड १९ सोबत प्रत्येकाने आपापल्यापरीने लढा दिला. पण हे करताना ज्या लोकांमुळे आज आपण सुखरूप आहोत आणि ज्यांनी आपले प्राण गमावले अशांच्या कुटुंबियांसाठी काहीतरी करावे असं आमच्या विभागाने ठरवलं आणि ह्या उपक्रमाची कल्पना सुचली व आम्ही ती राबवायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही दिलेल्या आवाहनाला स्वयंसेवी संस्था, माजी विद्यार्थिनी, शिक्षकवृंद व काही दानशूर व्यक्तींनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही ही योजना आखली.
हि योजना कोविड -१९ मृताची मुलगी, महाराष्ट्र पोलिस कर्मचारी (मुलगी), वैद्यकीय कर्मचारी / आरोग्य कर्मचारी (डॉक्टर, नर्स, पॅरा-मेडिकल स्टाफ, लॅब स्टाफ, फार्मासिस्ट किंवा कोणत्याही रुग्णालयात काम करणारे इतर कर्मचारी यांच्या मुली, महानगरपालिका / परिषद / नगरपंचायती किंवा इतर कोणत्याही महानगरपालिका किंवा जिल्हा प्रशासनात कार्यरत कर्मचार्‍यांची मुलगी, मीडिया व्यक्तींची मुलगी (मुद्रण, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया), कोविड १९ दरम्यान आपत्कालीन कर्तव्यावर बेस्ट व एसटी चालक व कंडक्टर यांची कन्या, बँक कर्मचार्‍यांची मुलगी, कोविड कर्तव्यावर असलेल्या बीएमसी शिक्षकांची कन्या या मधून इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा साठी प्रवेश घेतलेल्या किमान दहा विद्यार्थिनींना आणि उपरोक्त श्रेण्यांशिवाय कोविड -१९ मुळे ज्या कुटुंबांनी आपले उत्पन्नाचे साधन गमावले आहे अशा किमान दोन विद्यार्थिनींना फी भरपाई देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. या योजनेबाबत इतर कोणतीही माहिती हवी असल्यास मुलींच्या पालकांनी +91 93212 32238 नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे
ह्या उपक्रमाबद्दल बोलताना प्राचार्य सचिन लड्ढा म्हणाले, “गेली ४४ वर्ष आम्ही कौशल्य विकासाचे काम करत आहोत आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही सामाजिक स्तरावर कौशल्य विकासावर आधारित योजना राबवत असतो. मला वाटते की शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि कोणतीही आपत्ती आली त्याच्यावर मात करून पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधारस्तंभाचे काम करणे ही शिक्षणसंस्थांची नैतिक जवाबदारी आहे. आजपर्यंत विविध माध्यमांच्या मदतीने आम्ही दर्जेदार शिक्षण हे तळागाळातील विद्यार्थिनींपर्यंत कसे पोहचेल याचा प्रयत्न करत असतो” त्याच अनुषंगाने समाजाप्रती असलेल्या आपल्या देण्यापोटीच्या भावनेतून कॉलेज मधील एका विभागाने सुरू केलेला या अभिनव उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले व इतरही विभाग आपापल्या परीने पैशाअभावी कुणी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत आहेत असे नमूद केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button