
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावीत- आमदार योगेश कदम यांचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार याना निवेदन
खेड : खेड तालुका पशुधन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम पशुधन विकासावर होत आहे. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातील शेकऱ्यांप्रयन्त पोहचत नसल्याने पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे तालुक्यातील पशु संवर्धन विभागात रिक्त असलेली पदे तात्काळ भरावीत आणि तालुक्याच्या पशुधन विकासाला चालना द्यावी अशी मागणी खेड-दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी पशुसर्वधन मंत्री सुनील केदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत माध्यमांना माहिती देताना आमदार योगेश कदम म्हणाले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासामध्ये पशुसंवर्धन देखील तितकेच महत्वाचे आहे. मात्र खेड तालुका पशुसर्वधन विभागातील तब्ब्ल २४ पदे रिक्त असल्याने याचा परिणाम पशु संवर्धनावर होत आहे. तालुक्यात पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकाऱ्यांची ५ पदे मंजूर असतानाही इथे केवळ दोनच पशुधन विकास अधिकारी कार्यरत आहेत. पशुधन पर्यवेक्षकांचीही इथे वाणवा आहे. तालुक्यासाठी १७ पदे मंजूर असताना केवळ एकाच पर्यवेक्षकावर संपूर्ण तालुक्याचा कार्यभार सांभाळण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सेवा देणाचे काम पशुधन पर्यवेक्षकांचे आहे. त्यांनी ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांबाबत माहिती द्यायची आहे. पशुधन वाढीसाठी प्रयत्न करायचे आहेत मात्र १७ पर्यवेक्षकांचे काम एकट्यालाच करावे लागत असल्याने अनेक शेतकरी शासनाच्या योजनांबाबत अनभिज्ञ आहेत.
जिल्हा पशुसंवर्धन विभागातही अधिऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.जिल्हास्तरावर पशुधन पर्यवेक्षकांची ७ पदे मंजूर असताना केवळ चारच पशुधन पर्यवेक्षक कार्यरत असून तीन पदे रिक्त आहेत. सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर असताना केवळ एकच सहाय्यक पशुधन विकास अधिकारी कार्यरत असून दोन पदे रिक्त आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी तालुक्यातील पशुपालकांना कुठल्याच सुविधा प्राप्त होत नसल्याने पशुसंवर्धन विभाग केवळ नावापुरताच उरला आहे.
पशुसंवर्धन व्यवसाय हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. शेतीचे काम ठराविक कालावधीत असते त्यामुळे उर्वरित काळात शेतकऱ्यांना उत्पन्नाचा मार्ग मिळत नाही. पशुसंवर्धन व्यवसायामुळे शेतकऱ्यांना बाराही महिने पूरक व्यवसाय मिळणे शक्य झाले आहे. दूध, अंडी व मांस अशा सारखी पशुजन्य उत्पादनांची बाजारपेठेतील वाढती मागणी लक्षात घेऊन पशुसंवर्धनाचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचा तसेच सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागात आवश्यक पदे भरणे गरजेचे असल्याचे आमदार योगेश कदम यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com