
खेड-दापोली रस्त्याची चाळण; वाहन चालक व पादचाऱ्यांमधून संताप
खेड : खेड शहरातील मिनाताई ठाकरे नाट्यगृहासमोरील रस्त्याची चाळण झाली असल्याने या ठिकाणी वाहने हाकताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्याने पादचाऱ्यांवर वारंवार अभिषेक होवू लागला असल्याने पादचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
खेड शहरातून दापोलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच हे खड्डे पडले आहेत. तहसिलदार कार्यालय, पोलीस स्थानक, न्यायालयाकडे जाण्यासाठी याच रस्त्यावरून जावे लागत असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची आणि पादचाऱ्यांचीही वर्दळ असते. रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहन चालकांना जशी तारेवरची कसरत करावी लागते तशीच कसरत अंगावर खड्ड्यातील पाणी उडू नये यासाठी पादचाऱ्यांना करावी लागत आहे. हा रस्ता नगरपालिका हद्दीत येत असल्याने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पादचाऱ्यांना कायम चिखल-पाण्याच्या अभिषेकाला सामोरे जावे लागत आहे.
खेड भरणे मार्गाच्या डांबरीकरणाचे काम उन्हाळ्यात करण्यात आले होते. गेली काही वर्षे खड्ड्यात गेलेला हा रस्ता गुळगुळीत झाल्याने पादचारी आणि वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र त्यांचे हे समाधान फार काळ टिकले नाही. पावसाळ्यात रस्त्याची चाळण झाली आणि ठेकेदाराने केलेल्या कामाचा दर्जा उघड झाला.
खेड भरणे मार्गाचे डांबरीकरण केल्यानंतर या मार्गावर सुसाट धावणाऱ्या वाहनांच्या वेगाला ब्रेक लागावा यासाठी शिवाजी चौक ते ते एसटी डेपो या दरम्यान स्पिड ब्रेकर बसविण्यात आले होते. यासाठी शासकिय निधी खर्च करण्यात आला. परंतू केवळ तीन महिन्यातच या सर्व स्पिड ब्रेकर्सचे अस्तित्वच नष्ट झाल्याने स्पिड ब्रेकर्ससाठी केलेला खर्च वाया गेला आहे.
भरणे-दापोली हा शहरातून जाणारा मुख्य रस्ता आहे. दररोज हजारो वाहने आणि तितकेच पादचारी या रस्त्यावरून ये-जा करत असतात. याच रस्त्याची झालेली चाळण अपघाताचे कारण होवू शकते म्हणूनच नगर परिषद प्रशासनाने मिनाताई नाट्यगृहासमोरील रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ भरावे आणि पादचाऱ्यांची चिखल पाण्याच्या अभिषेकापासून मुक्तता करावी अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.com