
पुणे भोरमार्गे कोकणात जाणारा वरंध घाट ३ महिने ‘या’ वाहनांसाठी बंद
राज्यात पावसाचा जोर वाढला असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय. दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. दरम्यान, दरडी कोसळण्याची शक्यता, रस्ता खचणे, माती वाहून जाणे यांसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून भोर मार्गे महाडला जाणारा वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.तीन महिन्यांसाठी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
वरंध घाट हा पुण्याहून भोर मार्गे कोकणात महाडला जातो. या घाटातील सर्व प्रकारची अवजड वाहतूक पुढील तीन महिने बंद असणार आहे. हवामान खात्याचा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा हलक्या वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूक या घाटातून बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत




