फिडे ऑनलाईन ओलीम्पियाडच्या फायनल मध्ये भारताची धडक
अनेक नाट्यमय घडामोडी नंतर भारताचा फायनल मध्ये प्रवेश. पहिल्यावहिल्या ऑनलाईन स्पर्धेत भारताचे पदक निश्चित !
जागतिक बुद्धिबळ संघटना – फिडे यांनी आयोजित केलेल्या जागतिक ऑनलाईन ओलीम्पियाडच्या फायनल मध्ये भारतीय संघाने धडक मारली असून ह्या पहिल्यावहिल्या जागतिक विश्वयुद्धात आपले पदक निश्चित केले आहे. सोशल डिस्टनसिंग आणि कोरोनाच्या काही नियमावलीमुळे सध्या सगळीकडेच कला-क्रीडा क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीने नवनवीन अभिनव प्रयोग केले जात आहेत. जागतिक बुद्धिबळ संघटनेने सुद्धा पुढाकार घेऊन सदर स्पर्धेचे आयोजन केले असून ह्या स्पर्धेत तब्बल १६० हून अधिक देशांनी सहभाग घेतला होता.
प्रत्येक देशातील खेळाडूंच्या गुणांकनानुसार स्पर्धेत एकूण ५ गट करण्यात आले आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व नाशिकचा विदिथ गुजराथी करत असून श्रीनाथ नारायणन उपकप्तानपद आणि तांत्रिक जबाबदारी सांभाळत आहे. पाच वेळा जगज्जेता झालेला भारताचा विश्वनाथन आनंद, विदिथ गुजराथी, पी हरिकृष्णा, अरविंद चिदंबरम हे अनुभवी तर निहाल सारीन आणि आर. प्रग्नानंधा यांच्यासारख्या युवा ग्रँडमास्टर्सच्या जोडीने जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेची विजेती कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली, भक्ती कुलकर्णी यांच्यासारख्या अनुभवी महिला खेळाडू आणि दिव्या देशमुख, आर. वैशाली, वन्तिका अग्रवाल यांच्यासारख्या युवा महिला खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व ह्या स्पर्धेत करत आहेत !
दि. २८ ऑगस्ट रोजी आर्मेनिया सोबत झालेल्या लढतीत पहिल्या फेरीत भारतीय संघाने विजय मिळवला. सदर फेरीत आर्मेनियाच्या एका खेळाडूचे इंटरनेट कनेक्शन गेल्याचे समोर आल्याने ह्या फेरीस एक वेगळेच वळण आले. पण या आधीही अश्या काही घटना ह्या स्पर्धेत होऊन गेल्या असल्याने (प्राथमिक फेरीत भारताचे सुद्धा तब्बल तीन पॉईंट ह्या करणामुळे गेले होते) पंचांनी तांत्रिक बाजू तपासून भारताचा विजय निश्चित केला. सदर निर्णयावर आर्मेनियाच्या खेळाडूंनी आक्षेप घेऊन अपील्स कमिटी समोर हा विषय ठेवला असता अपील्स कमिटीनेसुद्धा पंच्याचा निर्णय बरोबर असल्याचे सांगताच भारताच्या पहिल्या फेरीच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ह्याचा निषेध म्हणून अर्मेनियाने दुसरी फेरी खेळण्यास नकार दिल्याने भारताचे उपांत्य फेरीचे दरवाजे खुले झाले होते.
दि. २९ ऑगस्ट रोजी झालेल्या उपांत्य सामन्यात पहिल्या फेरीत भारताला पोलंड कडून २-४ अश्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. स्पीड गन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निहाल सरीनने एकमेव विजयाची नोंद केली तर हम्पी आणि हरिका यांनी आपापले डाव बरोबरीत सोडवले. विदित, आनंद आणि दिव्या ह्यांना ह्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्य गटाच्या दुसऱ्या फेरीत मात्र भारताने जोरदार मुसंडी मारत ४.५ – १.५ असा विजय मिळवत स्पर्धेतील आपले अस्तित्व कायम ठेवले. जगज्जेत्या आनंदने आपला ह्या स्पर्धेतील पहिलाच डाव अगदी मोक्याच्या क्षणी जिंकला तर विदित, हम्पी, हरिका यांनीदेखील आपले डाव जिंकत भारताच्या विजयात मोलाचा वाट उचलला.
दोन फेऱ्यांची ही उपांत्य लढत १-१ अशी बरोबरीत सुटल्याने आर्मगडन (टाय ब्रेकर) गेमवर आपल्या संघाचे सामन्यातील भवितव्य अवलंबून होते. भारताची सुपरवूमन कोनेरू हम्पी हिने ह्या गेम मध्ये विजय मिळवत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला असून भारताचे ह्या स्पर्धेतील रजत पदक निश्चित झाले आहे. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी सर्वच बुद्धिबळपटू आणि बुद्धिबळप्रेमींचा उत्साह निश्चितच वाढलेला असून सर्वांच्याच नजरा अंतिम फेरीकडे लागलेल्या आहेत. उप-उपांत्य फेरीत आर्मेनिया सोबत झालेल्या लढतीतील नाट्यमय घडामोड आणि उपांत्य फेरीतसुद्धा पहिला डाव हरून मग बरोबरी साधल्यावर टायब्रेकर डाव जिंकून अंतिम फेरीत धडक मारल्याने भारतीय संघाचे मनोधर्य उंचावले असल्याचे आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी यांनी सांगितले.
www.konkantoday.com