चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी खेड आगाराकडून विशेष गाड्यांचे नियोजन
खेड : गौरी-गणपती विसर्जनानंतर मुंबईला परतणाच्या चाकरमान्यांसाठी खेड एसटी आगाराने मुंबई, ठाणे, बोरीवली या मार्गावर विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. चाकरमान्यांच्या सोयीसाठी ग्रुप बुंकीगची सुविधाही आगाराकडून देण्यात आली असून ग्रुप बुकिंगला चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आगार प्रमुख प्रशांत करवंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गौरी- गणपती हा कोकणातील महत्वाच्या सणांपैकी एक सण आहे. या सणानिमित्त मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या औद्योगिक शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्ताने स्थाईक झालेले चाकरमानी मोठ्या संख्यने गावी येतात. गौरीगणपतींचे विसर्जन झाल्यावर चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघतात त्यामुळे या दरम्यान कोकणातून मुंबई, पुणे यासारख्या शहरांकडे जाणाऱ्या गाड्यांना तुफान गर्दी होते.
या वर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने या वर्षी कोकणात आलेल्या चाकरमान्यांची संख्या मर्यादीत आहे. मात्र जे चाकरमानी गावी आले आहेत त्यांनी परतीच्या प्रवासासाठी एसटीला पसंती दिली असल्याने एसटीसाठी प्रवाशांनी गर्दी झाल्याचे चित्र आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुकर व्हावा यासाठी खेड एसटी आगाराने मुंबई, बोरीबली, ठाणे या मार्गावर ९१ विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. २७ ते २९ या दरम्यान गावी आलेल्या अनेक चाकरमान्यांना घेऊन या एसटी बसेस मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. खेड आगाराने यंदा प्रवाशांसाठी ग्रुप बुकिंगचीही सुविधा उपलब्ध करून दिली होती. या सुविधेचाही चाकरमान्यांनी लाभ घेतला .
कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावू नये यासाठी शासनाने सुचित केलेल्या सर्व खबरदाऱ्या घेऊन प्रवाश्याना एसटी सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याचे आगारप्रमुख करवंदे यांनी सांगितले.
www.konkantoday.com