कोकण रेल्वे प्रशासनाने तुतारी एक्सप्रेस कायमस्वरुपी सुरु ठेवावी-आमदार योगेश कदम यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
खेड : लॉकडाऊन आणि त्यानंतर कोकणात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने तुतारी एक्सप्रेस ही गाडी कायमस्वरुपी सुरु ठेवावी अशी मागणी दापोली-खेड मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी केली आहे. याबाबत लवकरच कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थपकना निवेदन देण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना आमदार कदम म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉँकडाऊन झाल्यावर मुंबईस्थित अनेक चाकरमानी कोकणात आले. यामध्ये काहीजणांनी तर पायी चालत आपला गाव गाठला. त्यानंतर सुरु झालेल्या गणेशोत्सवादरम्यान चाकरमान्यांसाठी खास एसटी आणि रेल्वेच्या गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे गणेशोत्सवासाठीही अनेक चाकरमानी आपापल्या गावी आले आहेत.
गणेशोत्सव संपल्यावर गावी आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. परतीच्या प्रवासादरम्यान चाकरमान्यांना रेल्वे प्रवास सोयीचा ठरणार असल्याने कोकण रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. मात्र उपलब्ध माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर परतीची शेवटची ट्रेन ५ संप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून सुटणार आहे.
५ संप्टेंबर नंतर कोकण रेल्वेने या मार्गावर गाड्या चालविणे बंद केल्यास या तारखेनंतर मुंबईत परंतु इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना खासगी बसचा आधार घ्यावा लागणार आहे. सद्यस्थितीत खासगी बसमालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याने खासगी गाड्यांनी परतीच्या प्रवासाला निघणे म्हणजे चाकरमान्यांचे कंबरडे मोडण्यासारखे आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे चाकरमानी आधीच आर्थिक संकटात आले आहेत. त्यात परतीच्या प्रवासासाठी त्यांना हजारो रुपये मोजावे लागले तर चाकरमान्यांची अवस्था अतिशय दयनिय होणार आहे. चाकरमान्यांची होणारी ही संभाव्य गैरसोय लक्ष्यात घेत ५ संप्टेंबर रोजी रत्नागिरीतून शेवटची ट्रेन सुटणार असली तरी त्यानंतर कोकणातील प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासनाने तुतारी एक्सप्रेस कायमस्वरुपी सुरु ठेवावी अशी मागणी आमदार योगेश दादा कदम यांनी केली आहे. कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना या बाबत निवेदन देण्यात येणार आहे.
www.konkantoday.com