मंदिरे उघडण्यासाठी उद्या रत्नागिरीत भाजपतर्फे होणार घंटानाद
रत्नागिरी, ता. 28 ः कोरोना महामारी व त्यामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली. परंतु आता अनलॉक सुरू झाले असून आता मंदिरे सुरू झाली पाहिजेत, अशी मागणी करत ‘दार उघड उद्धवा’ घंटानाद आंदोलन भाजपतर्फे उद्या २९ आॅगस्ट राेजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, सरचिटणीस उमेश कुळकर्णी व सतेज नलावडे यांनी दिली.
राज्यात उद्या ( ता 29) सकाळी 11 वाजता महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना, धर्माचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन ठाकरे सरकारला घंटानाद करून इशारा देणार आहेत. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर, धामणसे, कर्हाडेश्वर मंदिर, पावस, गणपतीपुळे, पाली, निवळी, हातखंबा, मारूती मंदिर आदीसह अनेक मंदिरांमध्ये घंटानाद आंदोलन होणार आहे. यामध्ये भाजपचे रत्नागिरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, भाविक सहभागी होणार आहेत. दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन व जिल्हा पदाधिकारी हेसुद्धा यात सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकारनेही 4 जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले. त्यानुसार देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू झाली. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाजपने केली आहे.
‘दार उघड उद्धवा दार उघड’, ‘दारू नको भक्तीचे दार उघड’, ‘मदिरा चालू, मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’, ‘भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल’, अशा घोषणाही या वेळी देण्यात येणार आहेत. भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर, फेस मास्कचा वापर करून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन तालूकासरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी केले आहे
www.konkantoday.com