
धुळे येथील अभाविप कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला तसेच विविध समस्यांसदर्भात अभाविप चे राजापूर तहसीलदारांना निवेदन
राजपूर: कोरोना विषाणू (कोव्हीड -१९) चा प्रादुर्भाव व त्यामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदी मुळे राज्यातील सर्व क्षेत्रावर दुरगामी परिणाम झाला आहे व त्याला शिक्षणक्षेत्र देखील अपवाद नाही. मागील पाच महिन्याच्या काळामधील शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भातील महाराष्ट्र स्तरावर निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेता अभाविप राजापूर तर्फे पुढील मागण्या करण्यात आल्या.
१)कोरोना महामारीमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे.
२) शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३०% कपात करण्यात यावी.
3) सरासरी च्या सूत्रामुळे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे.
४) नवीन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शैक्षणिक शुल्काच्या जास्तीत जास्त १५% शुल्क घेऊन प्रवेश देण्यात यावा व उर्वरित शैक्षणिक शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावे.
५) स्वायत्त (खाजगी) विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठित करण्यात यावी.
या प्रश्नांना घेऊन अभाविप महाराष्ट्रभर विविध विद्यापीठांचे कुलगुरू, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व पालकमंत्री यांना भेटून कार्यकर्ते विद्यार्थ्यांचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र भर मांडत असताना दि.२६ ऑगस्ट २०२० रोजी अभाविप धुळे शाखेचे कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांची भेट पालकमंत्री यांनी टाळली. म्हणून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी पालकमंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस प्रशासनाने अमानुषपणे लाठीमार व बुक्यांचा मारा केला. वरील घटनेच्या पार्श्वभूमीवर अभाविप राजापूर तर्फे घटनेच्या वेळेला आपल्या आलिशान गाडीत बसून फक्त बघ्याची भूमिका घेणारे पालकमंत्री अब्दुल सत्तार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा ही मागणीही करण्यात आली.
सदर मागण्यांचे आधिकारीक पत्रक हे राजापूरच्या नायब तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी राजापूर तालुकाप्रमुख पराग पालसुलेदेसाई,द.रत्नागिरी जिल्हा महाविद्यालय प्रमुख ईशान पाळेकर,अभाविप कार्यकर्ता सर्वेश बाकाळकर,अभाविप कार्यकर्ता अनुष्का मोहिते उपस्थित होते.
www.konkantoday.com