वजनदार वस्तूने डोक्यात प्रहार करून होडकाड येथे प्रौढाचा खुन,संशयित पोलिसांच्या ताब्यात

खेड : खेड तालुक्यातील होडकाड येथे एका अपंग व्यक्तिचा डोक्यात वजनदार वस्तूचा प्रहार करून खुन झाल्याची घटना उघड झाली आहे. नारायण सदू शिगवण (५०) असे या खुन झालेल्या व्यक्तिचे नाव असून ही घटना मंगळवारी रात्री ही घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
होडकाड येथे राहणार नारायण शिगवण यांना लहानपणी पोलिओ झाल्याने ते अपंग होते. काल सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ते आपली मुलगी भक्ती हिला “आंघोळीचे पाणी तापवून ठेव; मी लवकरच परत येतो’ असे सांगून घराबाहेर पडले. रात्री उशीरापर्यंत ते घरी न परतल्याने काळजीत पडलेल्या भक्तीने आपले काका यशवंत शिगवण यांच्या घरी जावून बाबा अद्याप घरी न परतल्याचे सांगितले. सायंकाळी ५.३० वाजता बाहेर गेलेला आपला भाऊ रात्रीचे १०.३० वाजले तरी घरी न परतल्याची माहिती मिळताच यशवंत शिगवण यांनी आणखी एक दोघांना सोबत घेऊन त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र काळोख असल्याने त्यांना अडचणी येत होत्या. दरम्यान गावातील आणखी काहीजण त्यांच्या सोबत आल्यानंतर त्यांनी पुन्हा नारायण शिगवण यांचा शोध घ्यायला सुरवात केली.
नारायण शिगवण यांचा शोध घेणारे गावातील युवक होडकाड बसस्टॉप येथे आले असता त्या ठिकाणी त्यांना कसली तरी झटापट झाल्याचे निदर्शनास आले. तसेच रस्त्यावरून कुणाला तरी जंगलामध्ये ओढत नेल्याच्या खुणाही दिसून आल्या. नारायण शिंदे यांचा शोध घेणाऱ्या युवकांनी त्या खुणांचा माग काढला असतात एसटी स्टॉपपासून सुगारे ५० मिटर अंतरावर त्यांना नारायण शिगवण यांचा मृतदेह आढळून आला.
होडकाड येथील पोलीस पाटील यांना याबाबत खबर दिल्यानंतर पोलीस पाटील यांनी खेड पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . मृत नारायण शिगवण यांच्या डोक्यावर, गुप्तांगावर तसेच तोंडावर कोणत्या तरी जड वस्तूने प्रहार केल्याच्या खुणा असल्याने कुणीतरी अज्ञाताने जड वस्तूचा प्रहार करून त्यांचा खुन केला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी त्याच गावातील एका संशयितास ताब्यात घेतले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.. खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सौ सुवर्णा पत्की अधिक तपास करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button