
कोकणातील वणवे थांबविण्यासाठी शासनाने कायदा करावा आमदार योगेश कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
खेड : उन्हाळ्यामध्ये कोकणात वणवे लागण्याचे प्रमाण फार मोठे आहे. अनेकदा हे वणवे जाणीवपुर्वक लावण्यात येतात.याबाबत कोणताही कायदा नसल्याने जाणीवपुर्वक वर्णवे लावणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. परंतू अशा वणव्यांमुळे बागायतदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. कोकणातील हे वणवे थांबावे यासाठी शासनाने कायदा करून जाणीवपुर्वक वणवे
लावणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद करावी अशी मागणी खेड-दापोली-मंडणगड विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत माहिती देताना योगेश कदम म्हणाले, कोकण हा निसर्ग समूद्ध प्रांत आहे. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती आहे. येथील शेतकऱ्यानी ही काबाडकष्ट करून आंबा, काजू, नारळी यासारख्या फळबागा फुलवल्या आहेत. या बागांमधून येणाऱ्या उत्पनांमुळे येथील शेतकऱ्याना आपला आर्थिक उत्कर्ष साधणे शक्य होते आहे. परंतु या निसर्गरम्य कोकण प्रातांला वणव्याचा शाप आहे.
उन्हाळ्यामध्ये अचानक लागणाऱ्या या वणव्यामध्ये निसर्ग संपत्तीचा मोठ्या प्रमाणात हास होतो. शेतकऱ्यानी काबाडकष्ट करून फुलविलेल्या आंबा काजूच्या बागा बेचिराख होवून जातात. जनावरांसाठी आवश्यक असणाऱ्या कडब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वनसंपत्तीचा ऱ्हास करणारे बहुतांशी वणवे जाणीव पुर्वक लावलेले असतात. वणवा लावण्यामागे कोण आहे हे अनेकदा माहितीही झालेले असते. मात्र या गुन्ह्यासाठी अद्याप कोणताही कायदा झालेला नसल्याने वणवा लावणारा माहित असूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
स्वतःच्या समाधानासाठी जाणीवपुर्वक वणवे लावून वनसंपत्ती नष्ट करणाऱ्या समाजकंटकावर जो प्रयन्त कठोर कारवाई करणारा कायदा होत नाही तो प्रयन्त कोकण वणव्याच्या शापातून मुक्त होणार नाही. त्यामुळे शासनाने कठोर कायदा करून कोकणाला वणव्याच्या शापातून मुक्त करावे अशी मागणी आमदार योगेश कदम यांनी केली असून या निवेदनाच्या प्रति वनमंत्री संजय राठोड यांच्यासह प्रधान सचिवांना देण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com