
पोरक्या चैतालीची दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी
खेड : डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले असतानाही परिस्थितीपुढे हतबल न होता तालुक्यातील आंबवली न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी चैताली यादव हिने दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण प्राप्त करत उत्तुंग यशाला गवसणी घातली आहे. तिच्या या धवल यशाचे पूर्ण तालुक्याला कौतुक आहे.
केवळ पाच वर्षाची असताना एका अपघातात तिचे आई-वडील गेले आणि चैताली पोरकी झाली. इतर मुलं जेव्हा खेळत बागडत होती तेव्हा चैतालीच्या आयुष्यात संघर्ष सुरु झाला होता. आई-बाबा कुठे गेले हे देखील तिला माहित नव्हते. ७५ वर्षीय आजोबा नरेश यादव यांच्याशिवाय तिला कुणाचाही आधार नव्हता. मात्र आजोबानी तिची अशी काळजी घेतली कि तिला कशाशीच उणीव भासू दिली नाही. आजोबानी घेतलेल्या अपार कष्टाचे आज चैतालीने खऱ्या अर्थाने चीज केले आहे.
लहानपणापासूनच हुशार असलेल्या चैतालीने प्रशालेतील विविध स्पर्धासह खेळांमध्येही नैपुण्य प्राप्त करत आपल्या म्हाताऱ्या आजोबांची मान सतत उंचावली आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने चैतालीला खासगी शिकवणी लावणे शक्यच नव्हते. प्रसंगी पोटाला चिमटे काढत ती शिक्षण घेत होती. दरवर्षी चैतालीचा शैक्षणिक आलेख चढताच असल्याने शिक्षक वर्गाचीही ती लाडकी विद्यार्थिनी होती. केवळ शाळेत शिक्षक जे शिकवतील त्याचेच मनन आणि चिंतन करून चैतालीने दहावीच्या परीक्षेत मिळवलेले उतुंग यश इतरांसाठी निश्चितच आदर्शवत आहे.
आपल्या पोरक्या नातीला शिकवून मोठी सायबीन करायचे ही अपेक्षा बाळगून आजोबा नरेश यादव तिच्यासाठी अपार कष्ट उपसत होते. नातीला उच्च विद्याविभूषित करणे हा एकमेव ध्यास त्यांनी उराशी बाळगला होता. पै-पै गाठीला बांधत ते तिच्या शिक्षणाचा भार समर्थपणे पेलत होते. जोडीला चैतालीची जिद्द आणि चिकाटी होती. आपण शिकून मोठे व्हावे यासाठी आपले आजोबा काय कष्ट करत आहेत याची चैतालीला जाणीव होती. दहावी परीक्षेत ९० हुन अधिक टक्के गुण मिळवायचेच हे तिचे स्वप्न होते. प्रशालेतील शिक्षकही तिच्या स्वप्नपूर्तीसाठी तिला योग्य ते मार्गदर्शन करत होते . अखेर दहावीला तिला ९३.४० टक्के गुण मिळाले आणि तिचे स्वप्न साकार झाले. तिने घेतलेल्या श्रमामुळे तिचे स्वप्न तर साकार झालेच परंतु आजोबांनी उपसलेले अपार कष्ट सार्थकी लागले .
शालेय अभ्यासात हुशार असलेल्या चैतालीने वक्तृत्व स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवली आहेत. खो-खो खेळातही ती निपूण असून अनेक कलागुणही तिच्या अंगी दडले आहेत. दहावीच्या परीक्षेत प्रशालेसह आंबवली केंद्रात अव्वलस्थान पटकावणाऱ्या चैतालीने इंग्रजी विषयात १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले आहेत.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉक्टर किंवा सनदी अधिकारी बनण्याची महत्वाकांक्षा तिने उराशी बाळगली आहे. तिच्या या महत्वाकांक्षेला सत्यात उतरवण्यासाठी सढळ हस्ते मदत करणाऱ्या दात्यांची गरज आहे.
www.konkantoday.com




