मिर्‍या -नागपूर चौपदरीकरणातील जागा मालक मोबदल्याच्या प्रतीक्षेत

मिर्‍या (रत्नागिरी)- नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या (क्र. 166) भूसंपादनासाठी रत्नागिरी तालुक्यातील फक्त सहा गावांच्या मोबदल्याची रक्कम उपलब्ध झाली आहे. परंतु झाडगाव, नाचणे, कुवारबाव, खेडशी आदी गावांतील जमीनमालकसुद्धा मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. भूसंपादन प्रक्रिया 2017 सालापासून होऊन अद्यापही मोबदला मिळत नसल्याने तसेच या जागेवरील दुकाने, व्यवसाय आदींचे पुढे काय करायचे असा प्रश्‍न या जमिनमालकांना पडला आहे. यामध्ये जिल्हाधिकारी व प्रांताधिकार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली आहे.
अलीकडेच 6 गावांच्या मोबदल्याची रक्कम 69 कोटी 13 लाख 11 हजार 164 रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. या रक्कमेचे वाटप सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
मिर्‍या-कोल्हापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया 2017 सालापासून सुरू झाली. रत्नागिरी ते आंबा घाटापर्यंतच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरी उपविभागीय कार्यालयाकडे देण्यात आली. संगमेश्‍वर तालुक्यातील 13 गावांमधील एकूण 13 लाख 36 हजार 837 चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्यातील 6 लाख 52 हजार 220 चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. रत्नागिरीतील सहा, संगमेश्‍वर तालुक्यातील 10 अशा 16 गावांतील जमीन मालकांचे मोबदला निवाडेही फेब्रुवारी 2019 मध्ये झाले आहेत. या निवाड्यांची एकूण रक्कम 314 कोटी 13 लाख 21 हजार इतकी आहे. या निवाड्यांचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. मात्र वर्षभरानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये केवळ रत्नागिरी तालुक्यातील 6 गावांच्या निवाड्याची रक्कम 69 कोटी 13 लाख रुपये प्राधिकरणाकडून येथील उपविभागीय कार्यालयाकडे प्राप्त झाली. मात्र कोरोना महामारीमुळे या निधीचे वाटप खोळंबले होते.
आता ही प्रक्रिया सुरू झाली असून खातेदारांना नोटीस पाठवण्यास सुरवात झाली आहे. सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून मोबदला वाटपाला प्रारंभ होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा आणि पानवल या सहा ठिकाणांची जमिनीचा मोबदला रक्कम प्रांत कार्यालयाकडे फेब्रुवारीत आली. आता त्याचे वितरण केले जाणार आहे.
या गावांचा समावेश
संगमेश्‍वर तालुक्यात करंजारी, जंगलवाडी, दाभोळे, मेढे तर्फ देवळे, साखरपा, दखिण, निनावे, मुर्शी, ओझरे, चोरवणे या गावांचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यात पानवल, हातखंबा, पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू झाडगाव, नाचणे, पडवेवाडी, मधलीवाडी, कुवारबाव, कारवांचीवाडी, खेडशी, नाणीज, पोमेंडी खुर्द या गावांचा समावेश होतो. यातील बहुतांशी जागामालक निधीच्या प्रतीक्षेत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button