
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी सोशल डिस्टन्ससिंगचा पुरता बोजवारा
खेड :यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी गणेशभक्तांचा उत्साह जरासुद्धा कमी झालेला नाही. कोरोनाची भिती पाठीवर घेत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी भाविक बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. गेल्या अनेक महिन्यांनंतर प्रथमच बाजारपेठे गर्दीने फुलून गेली असल्याने सोशल डिस्टन्शिनचा पुरता बोजवारा उडाला आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडून याकडे पुर्णपणे कानाडोळा केला जात आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाच्या सणांपैकी एक सण असल्याने हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर घरी येणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी भाविक वेगवेगळ्या प्रकारची आरास करतात त्यामुळे या उत्सवादरम्यान बाजारात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पहावयास मिळते. मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झालेले चाकरमानीही या उत्सवादरम्यान गावी येत असल्याने बाजारातील गर्दीमध्ये आणखीनच भर पडते. गणेशोत्सव आणि गर्दी हे वर्षांनुवर्षाचे चित्र आहे. मात्र यंदाची परिस्थिती थोड़ी वेगळी आहे. या वर्षी जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने गणेशोत्सवाच्या उत्साहावर मर्यादा आल्या आहे.
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने हा सण अतिशय साधेपणाने साजरा करण्याच्या सुचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने या उत्सवादरम्यान नागरिकांनी गर्दी करू नये असेही शासनाकडून बजावण्यात आले आहे. मात्र तरीही बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागलेले भाविक कोरोनाची भिती झुगारून खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत.
कोरोनाची भिती असली तरी आरासासाठीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होणार हे गृहीत धरून व्यवसायिकांनी आपापली दुकाने सजवली आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील दुकाने आरासासाठी लागणाच्या वस्तुंनी भरलेली दिसू लागली आहेत. वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होवू लागल्याने सोशल डिस्टन्शिचा पुरता बोजवारा उडाला आहे. बाजारात होणाऱ्या गर्दीवर स्थानिक प्रशासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. परंतू प्रशासनाने याकडे पुर्णपणे कानाडोळा केला असल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे
www.konkantoday.com