कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाईनचा नियम लागू करू नये यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
कोकणात गणेश चतुर्थी निमित्त दरवर्षी मुंबई, पुण्यातून लाखो चाकरमानी येतात परंतु यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट आले असून कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी कोकणात येणाऱया चाकरमान्याना शासनाने किमान 10 दिवस क्वारंटाईन सक्तीचे केले आहे.मात्र गणेशोत्सव तोंडावर आला असून क्वारंटाईनच्या नियमामुळे चाकरमान्यांची मोठी अडचण होणार आहे त्यामुळे कोकणात येणाऱया प्रवाशांना क्वारंटाईनचा नियम लागू करू नये अशी मागणी करत मुंबईतील एका चाकरमान्याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.शासनाने 10 दिवस क्वारंटाईनची अट घातली असून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने 7 ऑगस्ट रोजी तशी अधिसूचनाही जारी केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यात क्वारंटाईन येत नाही तसेच क्वारंटाईन करण्याचा शासनाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा करत मुंबईतील चाकरमानी संतोष गुरव यांनी अॅड. हर्षल मिराशी यांच्या वतीने याचिका दाखल केली आहे. क्वारंटाईनमुळे बाहेर जाण्यावर बंधने येत असून गणेशोत्सवासाठी खरेदी तसेच लोकांच्या भेटी गाठी घेता येत नसल्याने पंचाईत होणार आहे त्यामुळे क्वारंटाईनची जाचक अट रद्द करावी अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.
www.konkantoday.com