
खेड पंचायत समितीला कोरोनाचा विळखा; लोकप्रतिनिधींसह दोन कर्मचारी पॉझिटिव्ह
खेड : लोकप्रतिनिधींसह पंचायत समितीच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने खेड पंचायत समिती कार्यालय बाहेरच्या नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत समितीच्या प्रत्येक विभागात केवळ १० टक्के कर्मचारी काम करत असून अन्य कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
पंचायत समिती कार्यालय हे तालुक्याचे मुख्यालय आहे. याच कार्यालयातून अवघ्या तालुक्याचा कारभार हाकला जातो. मात्र याच कार्यालयाला आता कोरोनाचा विळखा पडला असल्याने तालुक्याचा विकास ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार खेड तालुका पंचायत समितीची सभापती, त्याचा खासगी मदतनीस आणि चालक या तिघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ पंचायत समिती कार्यालय बाहेरच्या नागरिकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवाय पंचायत समितीच्या सामान्य प्रशासन, अर्थ विभाग, ग्रामपंचायत, कृषी विभाग, आरोग्य विभाग, रोजगार हमी विभाग, स्वच्छ भारत मिशन, या सर्व विभागामध्ये केवळ दहा टक्के कर्मचारी ठेवून अन्य कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
पंचायत समिती कार्यालय हे तालुका विकासाचे मुख्य ठिकाण असल्याने या ठिकाणी ग्रामस्थांनी नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या कार्यालयातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पुढील काही दिवसांसाठी पंचायत समिती कार्यालय बाहेरच्या नागरिकांसाठी बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com