
लांजा तालुक्यातील साटवलीत वनविभागाची माकड पकड मोहीम.
लांजा तालुक्यातील साटवली गावात शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी माकडे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी एकूण २० माकडे पिंजराबंद करण्यात आली. माकडे पकडण्याची तालुक्यातील ही पहिलीच मोहीम साटवली येथे राबविण्यात आल्याने ग्रामस्थांकडून तिचे स्वागत करण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून साटवली परिसरात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता. लोकांच्या घरांवरील कौले व पत्रे यांच्या नुकसानीबरोबरच भाजीपाला शेती आणि बागा यांची देखील मोठ्या प्रमाणात या माकडांपासून नासधूस केली जात होती. माकडांच्या टोळीमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी वर्ग पुरते हैराण झाले होते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांच्यासह साटवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांतून वन विभागाने या ठिकाणी माकड पकडण्याची मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच साटवली परिसरात वन विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात आली. वन्यजीव प्राणी मित्र समाधान गिरी (रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी कुशलतेने माकडांना जेरबंद केले. www.konkantoday.com