मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आ. राजन साळवी यांनी केल्या विविध मागण्या, ओणी येथे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलची मागणी
आगामी गणेशोत्सव व कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शिवसेनेच्या 9मंत्री व आमदारांसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी आ. राजन साळवी यांनी मुंबई-गोवा महामार्गावर ओणी येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे या केलेल्या मागणीचा पुनरूच्चार करीत त्याला लवकर मंजुरी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. इंडिया टुडेच्या सर्वेक्षणामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये समावेश झाल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांचे यावेळी आ. साळवी यांनी अभिनंदन केले.
जिल्ह्यात सिव्हिल हॉस्पिटल तसेच उपजिल्हा रूग्णालय, तालुका कोविड सेंटर येथे एमबीबीएस डॉक्टर फिजिशियन, नर्सेस, टेक्निशियन, क्लार्क यांची भरती प्रक्रिया करावी. प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करावी तसेच औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. यापूर्वी केलेल्या मागणीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर ओणी येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे अशी मागणी आपण केली होती. त्याला लवकर मंजूरी देण्यात यावी. महामार्गावर एखादा मोठा अपघात झाल्यास मुंबई किंवा पुणे येथे रूग्णांना घेऊन जाण्यास १०८ रूग्णवाहिका उपलब्ध होत नाही. तरी त्यांच्या निकषात बदल करून रूग्णांना १०८ रूग्णवाहिका मुंबईसारख्या शहरांमध्ये जाण्यास उपलब्ध करून द्याव्यात. याच्याजोडीलाच शिवसेना पक्षाकडे व सरकारकडे रूग्णवाहिका मिळावी अशी मागणी केली असून त्याबाबत निर्णय घेवून रूग्णवाहिका मिळावी. कोविड १९ रूग्णालयात काम करणार्या कर्मचार्यांचा पगार वाढवावा अशा मागण्या आ. साळवी यांनी केल्या.
www.konkantoday.com