
मानसिक तणावातून पेटवून घेत तरुणाची आत्महत्या
मानसिक तणावातून एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील कोरेगाव बेलवाडी येथे घडली आहे. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र बाळकृष्ण शिंदे (वय ४८, रा. कोरेगाव बेलवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यांना नीट झोप लागत नव्हती आणि ते तणावाखाली होते.
१८ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या घरातील लोक झोपलेले असताना, रवींद्र यांनी घरात मोटर सायकलसाठी आणून ठेवलेलं पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेतलं आणि पेटवून घेतलं. यामध्ये ते गंभीररीत्या भाजले.
घरच्यांनी त्यांना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. खेड ते संगमेश्वर प्रवासादरम्यानच रुग्णवाहिकेत त्यांचा मृत्यू झाला.




