खेडमध्ये कोरोना फोफावतोय; आतापर्यंत ११ जणांचा बळी
खेड : गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. खेड तालुक्यात सध्या ९८ अंक्टिव्ह रुग्ण असून ११ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे मात्र कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली-असल्याने प्रशासनाच्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
९ एप्रिल रोजी खेड तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यानंतर तालुका प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे तालुक्यात कोरोनाला प्रतिबंध करणे शक्य झाले होते. मात्र आता खबरदारी उपाययोजनांमध्ये शिथिलता आली असल्याने कोरोनाचा फैलाव झपाट्याने होताना दिसत आहे. गेल्या पाच महिन्यात तालुक्यातील ४५८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाचे कोरोना प्रतिबंधक उपाय तोकडे पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.
तालुका आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळावधीत ज्या चाचण्या घेण्यात आल्या त्यामध्ये ४५८ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. यापैकी ३४९ जणांनी कोरोनावर यशस्वपणे मात केली आहे. मात्र ११ जणांचा या महाभयंकर विषाणूने बळी घेतला आहे.
www.konkantoday.com