कळंबणी कोव्हीड रुग्णालयात ३७ पदे रिक्त,रुग्णांवर उपचार करताना येत आहेत अडचणी

खेड :उत्तर रत्नागिरीत कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे कोव्हीड रुग्णालय सुरु करण्यात आले मात्र या रुग्णालयात तब्बल ३७ पदे रिक्त असल्याने दाखल रुग्णांवर उपचार करताना अडचणी येऊ लागल्या आहेत.
कळंबणी कोव्हीड रुग्णालय हे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांसाठी अतिशय महत्वाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात लाखो रुपये किंमतीचे अनेक व्हेंटीलेटर्स, चार एक्सरे मशिन्स आहेत. मात्र ही महत्वाची वैद्यकीय उपकरणे चालवण्यासाठी आवश्यक असलेली पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रुग्णालयात लाखो रुपयांची उपकरणे धूळ खात पडली आहेत. कोविड हॉस्पिटलसाठी एमडी फिजिशियन डॉक्टरची आवश्यकता असते मात्र या रुग्णालयात हे महत्वाचं पद देखील रिक्त आहे. शिवाय परिचारिका, फार्मासिस्ट, एक्सरे टेक्निशियन आणि सफाई कामगार अशी महत्वाची पदे देखील रिक्त आहेत.
सध्या खेडमध्ये कोरोनाचे ४३४ रुग्ण असून आत्तापर्यंत ९ जण कोरोनामुळे दगावले आहेत. शिवाय आता दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांतील रुग्ण देखील कळंबणी कोव्हीड रुग्णालयातच दाखल केले जात आहेत. परंतु या रुग्णालयात महत्वाची पदेच रिक्त असल्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत.
रुग्णालयात रिक्त असलेल्या पदांबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संभाजी गरुड यांना विचारले असता रुग्णालयात रिक्त असणाऱ्या पदांचा अहवाल रुग्णालयामार्फत शासनाकडे पाठवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button