
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ महाराष्ट्रात आणण्याच्या ऐतिहासिक सामंजस्य करारावर मंगळवारी लंडन येथे स्वाक्षरी
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ महाराष्ट्रात आणण्याच्या ऐतिहासिक सामंजस्य करारावर मंगळवारी लंडन येथे स्वाक्षरी करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ‘व्हिक्टोरिया व अल्बर्ट म्युझियम’च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारामुळे शिवरायांची वाघनखे परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान, या वाघनखांच्या पेटीवर ‘शिवरायांनी वापरलेली वाघनखे’ असा मजकूर असल्याचे दाखवत विरोधकांकडून केले जाणारे आरोपच सांस्कृतिक विभागाने एकप्रकारे खोडून काढले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ही वाघनखे परत आणण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी केली होती. यासंदर्भातील वाटाघाटीनंतर लंडन येथील व्हिक्टोरिया व अल्बर्ट म्युझियमने तीन वर्षांसाठी ही वाघनखे महाराष्ट्रात पाठविण्याचे मान्य केले. यासंदर्भातील सामंजस्य करार करण्यासाठी मंत्री मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सांस्कृतिक विभागाचे शिष्टमंडळ सध्या लंडन दौर्यावर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणल्यानंतर येथील चार संग्रहालयांत ती ठेवण्यात येणार आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम सातारा, सेंट्रल म्युझियम नागपूर, द लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूर आणि मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा समावेश आहे.
www.konkantoday.com