खेड तालुक्यातील पाच धरणं ओव्हरफ्लो,पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्याचे संकेत

खेड : गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसलधार पावसामुळे तालुक्यातील नातूवाडी, पिंपळवाडी, शिरवली, कोंडिवली, शेलारवाडी, ही सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाली असून या धरणांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे तालुक्याला भेडसावणारी पाणी टंचाई यावर्षी काही अंशी कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.
तालुक्यात, नातूवाडी, शिरवली, कोंडिवली, शेलारवाडी, पिंपळवाडी या धरणाची कामे पूर्ण झाली असून या धरणांमध्ये पाणीसाठा करण्यास सुरवात झाली आहे. नातूवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता १९.२२७ दलघमी इतकी असून सध्या या धरणाचा उपयुक्त साठा १८.३७७ दलघमी इतका आहे. सध्या या धरणाची पाणी पातळी ८८.१० मीटर इतकी असून या धरणातून २२८.५१२ घ.मी.पाण्याचा प्रति सेकंद विसर्ग होत आहे. तर शिरवली धरणाची पाणी पातळी ३९.७५ मीटर झाली असून या धरणातून ११.७२४ घ मी प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. या धरणात २.९७९ द.ल.घ.मी. इतका उपलब्ध पाणीसाठा आहे. आतापर्यन्त धरण क्षेत्रात २२३९ मि. मी. इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहणाऱ्या डुबी नदीवर बांधण्यात आलेल्या पिंपळवाडी धरणात १७.९४७ द.ल.घ.मी. इतका उपलब्ध पाणीसाठा असून पाण्याची पातळी १२६.६८ मीटर झाली आहे. धरण क्षेत्रात एकूण १२८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत २८५२ मि.मी. इतका पाऊस या भागात पडला आहे. या धरणाच्या सांडव्यावरून ९२.१६ घ.मी.प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सद्य स्थितीत कोंडिवली धरणात २.९६१ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून धरण क्षेत्रात आतापर्यंत १९८९ मी मी पावसाची नोंद झाली आहे.
शेलारवाडी धरणाची पाणीसाठवण क्षमता ६.९२२ द.ल.घ.मी. इतका आहे. या धरणात उपलब्ध पाणीसाठा ६.३५४ द.ल.घ.मी. झाला आहे.
तालुक्यात पोयनार आणि न्यू मांडवे या दोन धरणांची कामे गेल्या अनेक वर्ष्यांपासून सुरु आहेत. मात्र धरणाच्या कामांना गती नसल्याने ही धरणे पूर्ण होतील की नाही याबाबत शंका आहे. दरवर्षी या धरण प्रकल्पांवर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे मात्र धरणांची कामे इन्चभरही पुढे सरकत नसल्याने या दोन्ही प्रकल्पांचे भविष्य आजतरी अंधारातच आहे असे म्हणावे लागत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button