भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शेकडो शिवसैनिकांची नावे जाहीर करा नाहीतर खोटेपणा कबूल करा – शिवसेना शहरप्रमुख निकेतन पाटणे

खेड : चार दिवसांपूर्वी खेड येथे झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाजपात जाहीर प्रवेश करणाऱ्या शेकडो शिवसैनिकांची नावे जाहीर करा नाहीतर लोकांची दिशाभूल करण्यासाठी केलेला हा खोटेपणा होता हे कबुल करा अशा शब्दात शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे यांनी प्रवेशाचा दावा करणाऱ्याना भाजप पदाधिकाऱ्यांना खडसावले आहे. २ जून रोजी खेड येथे झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात खेडमधील शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला होता.
३ ऑगस्ट रोजी प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण उपास्थित असलेल्या या मेळाव्यात खेडमधील शेकडो शिवसैनिकाने भाजपात जाहीर प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रवेश करणाऱ्या एकही शिवसैनिकाचे नाव जाहीर करण्यात आलेले नव्हते. प्रवेश करणाऱ्या एकाही शिवसैनिकाचे नाव जाहीर न करता प्रवेशाचा दावा करणे हा जनतेची दिशाभूल करण्यासाठी केलेला खोडसाळपणा असल्याचे पाटणे यांनी म्हटले असून असा खोडसाळपणा शिवसेना कधीही खपवून घेणार नाही असे बजावले आहे.
बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल हा शिवसेनेचा बाणा आहे. त्यामुळे अश्या प्रकारच्या खोडसाळपणामुळे शिवसैनिकांमध्ये चलबिचल होईल असे जर कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. खेडमधील शिवसेना हि अभेद्य आहे आणि ती अभेद्यच राहणार आहे त्यामुळे केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी असे खोटे दावे खेडमध्ये तरी कुणी करू नये असेही पाटणे यांनी म्हटले आहे.
भाजपच्या या मेळाव्यात एक-दोघांनी प्रवेश केला ही असेल परंतु त्या व्यक्तींचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे शेकडो शिवसैनिकांनी प्रवेश केल्याच्या बोंबा मारणे म्हणजे सवंग प्रसिद्धीसाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. दापोली खेड मंडणगडचे आमदार योगेश कदम यांच्या विकासकामांचा धडाका पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली असल्याने विरोधक अशा प्रकारचा खोडसाळपणा करू लागले आहेत. मात्र योगेश कदम यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवक शिवसेनेच्या प्रवाहात दाखल होत आहेत हे विरोधाकानी विसरता काम नये असेही पाटणे यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन सुरु आहे. राज्यात १४४ कलम लागू असल्याने एकत्र येण्यास बंदी आहे. अश्या परिस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचा दावा करणे हे अज्ञानाचे प्रदर्शन आता तरी थांबवा असा उपरोधीक सल्ला देखील पाटणे यांनी दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button