खासगी ट्रॅव्हल्सच्या भरमसाठ दरवाढीने चाकरमानी होणार हैराण
कोकणात साजरा होणार्या गणेशोत्सवासाठी शासनाने रेल्वे सुविधा सुरू करण्याबाबत निर्णय जाहीर केला नसल्याने यावेळी चाकरमानी खाजगी ट्रॅव्हल्सचा पर्याय स्विकारत आहेत. मात्र गेले काही महिने खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनाही कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका बसला असल्याने यावेळी कोकणात येणार्या चाकरमान्यांना खाजगी ट्रॅव्हल्सच्या तिकिट दरामुळे मोठा फटका बसणार आहे. खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी चाकरमान्यांचे आरक्षण सुरू केले आहे. त्यासाठी एका प्रवाशाकडून एरवी असणारे ५०० ते ७०० रुपये भाडे यावेळी अंदाजे अडीच ते तीन हजार रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या चाकरमान्यांना हा भुर्दंड बसणार आहे. याबाबत खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांचे असे म्हणणे आहे की, शासनाने गाडीतून २१ प्रवाशांनाच नेण्याची मुभा दिली आहे. त्यामध्ये प्रवाशाचे परमीट, ई पास, डिझेल व ड्रायव्हरचा खर्च वाढला आहे. त्याशिवाय येतेवेळी ही बस रिकामी धावणार असल्याने ट्रॅव्हल्स चालकांचे मोठे नुकसान होणार असल्याने दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com