शासनाच्या निर्णयात वेगवेगळे निकष, एस.टी.ने येणार्या चाकरमान्यांना पासची गरज नाही, खाजगी गाडीने येणार्यांना पास अनिवार्य
चाकरमान्यांची नाराजी दूर करण्यासाठी आज महाराष्ट्र शासनाने कोकणात गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांसाठी एसटीची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हे करत असताना क्वॉरंटाईनचा कालावधीही दहा दिवसांचा करण्यात आला आहे. शासनाने एसटी वाहनाने प्रवास करताना ई पासची गरज नसल्याचे सांगितले असतानाच दुसरीकडे मात्र खाजगी वाहनाने प्रवास करताना ई पास अनिवार्य असल्याचे सांगण्यात आल्याने एकूणच शासन चाकरमान्यांबाबत एसटीने येणारे व खाजगी गाडीने येणारे असे वेगवेगळे निकष लावल्याने आणखीन गोंधळात भर पडली आहे. एसटीने प्रवास करणार्यांना ई पासची गरज नाही कारण या सर्वांची पोर्टलमध्ये नोंद होणार असल्याने प्रवाशांची सर्व माहिती एसटी विभागाकडे उपलब्ध राहणार आहे. म्हणून त्यांना ई पासची गरज नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे.
शासनाने खाजगी गाड्यांना याआधी ई पास अनिवार्य असल्याचे सांगितले होते परंतु ऑनलाईन अर्ज करूनही ई पास वेळेवर मिळत नसल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. यामुळे यात आता बनावट ई पासची देखील भर पडली आहे. काही खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडूनही बनावट पासचा वापर होत असल्याच्या घटना घडत आहेत. या सर्वांमुळे चाकरमान्यांचे हाल होत असून आता एसटी विभागाने तीन हजार एसटी सोडण्याचे जाहीर केले असले तरी अनेक चाकरमानी खाजगी गाड्या व खाजगी ट्रॅव्हल्सने येणार असल्याने त्यांच्यासमोर अद्यापही ई पासची समस्या कायम राहिली आहे. आज कशेडी घाटात पास नसलेल्या काही गाड्यांना परत पाठवण्यात आल्याचे वृत्त आले आहे. याशिवाय कोकणातील सरपंच संघटनेने क्वॉरंटाईनचा कालावधी १४ दिवसांपेक्षा कमी करण्यास विरोध केला होता. त्यामुळे आता शासनाने केंद्राच्या धोरणाप्रमाणे क्वॉरंटाईनचा कालावधी १० दिवसाचा केला असल्याने सरपंच संघटना कोणती भूमिका घेणार व कशा प्रकारे सहकार्य करणार असे मुद्दे आता उपस्थित होणार आहेत.
www.konkantoday.com