रत्नागिरीच्या टिळक आळीच्या प्रवेशद्वारावर लोकमान्य टिळकांचे फायबर शिल्प साकारण्याचा संकल्प
लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीनिमित्ताने रत्नागिरीच्या टिळक आळीच्या प्रवेशद्वारावर त्यांचे फायबर शिल्प साकारण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांचे कार्य अतुलनीय होतेअशा या लोकोत्तर महापुरुषाशी रत्नागिरीचे सख्यत्वाचे ऋणानुबंध आहेत. रत्नागिरी ही लोकमान्यांची जन्मभूमी आहे. ज्यांच्या नावामुळे टिळक आळी हे अभिमानास्पद नामाभिधान प्राप्त झाले, ती टिळक जन्मभूमी आणि ती वास्तू ऐतिहासिक वारसा सांगत उभी आहे.टिळकांचा हा वारसा सर्वांना सांगण्यासाठी आणि त्यांच्या प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन नित्य होण्यासाठी टिळक आळीच्या प्रवेशद्वाराजवळ अभ्यंकर कुटुंबीयांच्या चैतन्य या वास्तूवर लोकमान्य टिळकांचे फायबर शिल्प उभारण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीनिमित्ताने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. बारा फूट उंचीच्या या शिल्पासाठी काचेचे मोठे कपाट आणि विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. या कामासाठी निधीची आवश्यकता आहे. सर्व टिळकप्रेमींनी एकत्र येऊन शक्य असेल तेवढा निधी द्यावा, अशी विनंती चैतन्य लोकमान्य टिळक स्मारकातर्फे करण्यात आली आहे.
या संकल्पित कार्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या मिळवल्या आहेत. तसेच संकल्पचित्रदेखील तयार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तसेच देणगी देण्यासाठी टिळक आळी नाक्यावरील चैतन्य लोकमान्य टिळक स्मारकाचे अध्यक्ष आनंद गोविंद मावळंकर (81499 69213) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com