गणेशोत्सव तोंडावर आला तरी अद्याप शासनाची भूमिका स्पष्ट नाही
कोकणातील व कोकणवासियांच्या दृष्टीने महत्वाचा सण आता काही दिवसांवर येवून ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात येण्यास उत्सुक असून काहीजणांनी कोकणात येण्यास सुरूवातही केली आहे याबाबत शासन लवकरच धोरण जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. मात्र अद्यापही शासनाने चाकरमान्यांना आणण्याबाबत कोणतेही निर्णय जाहीर केलेला नाही. कोरोनामुळे लॉकडावून झाल्याने मार्च महिन्यात चाकरमानी कोकणात येवू शकले नाहीत मात्र अनेकांनी खाजगी गाडीने कोकण गाठले. जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यात दीड ते पावणेदोन लाख तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड लाखाच्या आसपास चाकरमानी आले. यामध्ये ई पासबाबतही अनेक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या. तर खाजगी वाहनचालकांनी यामध्ये अव्वाच्या सव्वा दर आकारले. यामुळे गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांनी एसटीची व रेल्वेची सेवा करावी अशी आधीच मागणी केली आहे. मात्र शासनाने अद्यापही निर्णय न घेतल्यामुळे चाकरमानी संभ्रमात आहेत. याशिवाय चाकरमान्यांच्या क्वॉरंटाईन काळाबाबतही ठोस निर्णय शासनाने जाहीर केला नसल्याने नेमके क्वॉरंटाईन किती दिवसाचे होणार याबाबत स्थानिक पातळीवर वेगवेगळे निर्णय जाहीर होत असल्याने चाकरमान्यांच्या संभ्रमात वाढ होत चालली आहे.
www.konkantoday.com