मानेज इंटरनॅशनल स्कूलला सी.बी.एस.ई. बोर्डाची कनिष्ठ महाविद्यालयासाठी मान्यता
रत्नागिरी येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई. बोर्डाच्या प्रतिथयश शाळेला कनिष्ठ महाविद्यालय स्थापन करण्यासाठी सी.बी.एस.ई. बोर्डाकडून मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता मिळालेली रत्नागिरी शहरातील मानेज इंटरनॅशनल ही पहिलीच शाळा आहे. यामध्ये विज्ञान, वाणिज्य व कला या तीनही शाखांना मान्यता आहे.
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.रवींद्रजी माने यांनी शाळेचे अभिनंदन केले. बारावीनंतर घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक शिक्षण प्रवेशासाठी ( JEE/ NEET/MH-CET इ.) हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या उपलब्ध संधीचा फायदा घेऊन आपला भविष्यकाळ उज्ज्वल करावा, असे आवाहन मा.श्री. रवींद्रजी माने यांनी केले आहे.
शाळेच्या कार्याध्यक्षा सौ.नेहा माने यांनीही अभिनंदन करून या कनिष्ठ महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी प्रशस्त इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग या सर्व सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होईल, याची खात्री दिली. यावर्षी विज्ञान आणि वाणिज्य या दोन शाखांचा अकरावीचा अभ्यासक्रम सुरू होत आहे. या अभ्यासक्रमासोबत सीईटी, जेईई आणि नीट या अभ्यासक्रमासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येईल. वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमासोबतच सी.ए.फाऊंडेशनसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शाळेचे व्यवस्थापक प्रद्युम्न माने आणि पी.एस.पी.एस.चे पदाधिकारी यांनीही शाळेचे अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक उल्हास सप्रे आणि समन्वयिका शीला डिसोझा यांनी सर्वांचे अभिनंदन केले. मुंबई , पुणे या महानगरात कोविडची साथ लक्षात घेता रत्नागिरीतच दर्जेदार उच्च शिक्षणाची सोय झाल्याबद्दल पालकवर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे.