
मासेमारीच्या नव्या हंगामाला प्रारंभ; पहिल्या दिवशी मच्छिमारांची निराशा
रत्नागिरी : मासेमारीच्या पहिल्याच दिवशी फारच कमी मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. ज्या नौका मासेमारीसाठी गेल्या होत्या, त्यांना अपेक्षित मासळी मिळाली नाही. पावसाळी बंदीनंतर 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाली आहे. ट्रॉलर आणि छोट्या पारंपरिक नौकांना 1 ऑगस्टपासून मासेमारीला परवानगी आहे. पर्ससीननेट मासेमारी 1 सप्टेेंबरपासून सुरु होणार आहे. पहिल्याच दिवशी 20 ते 25 ट्रॉलिंग नौका आणि इतर छोट्या नौका मिळून सुमारे 100 नौकांनीच पहिल्याच दिवशी मासेमारी करण्यासाठी समुद्राकडे कुच केली होती. ट्रॉलिंग नौका प्रामुख्याने म्हाकुळ आणि कोळंबीसाठी समुद्रात गेल्या होत्या. परंतु त्यांना अपेक्षित रिपोर्ट पहिल्या दिवशी मिळालेला नाही. इतर छोट्या नौकांचीही तीच अवस्था आहे.