
समुद्र किनाऱ्यावरील ऑईल, कचर्याचा कासवांच्या प्रजनन साखळीवर परिणाम
गुहागर : समुद्रकिनाऱ्यावर महापुरात वाहून आलेला कचरा आणि ऑईलचा थर अजूनही तसाच आहे. याचा परिणाम कासवांच्या प्रजनन साखळीवर होत आहे. अनेक मादी कासव अंडी न घालता परत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याची नोंद वन विभाग करत आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील ऑइलमिश्रीत कचरा दूर न झाल्यास याचा फटका जीवसृष्टीला बसणार आहे, अशी चिंता कासवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
गुहागर नगरपंचायतीने सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात जेसीबी लावून हा कचरा दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेसीबी वाळूत रुतत असल्याने या कामासाठी वेळ खर्च होतो. जेसीबीचे भाडे आणि होणारे काम याचे आर्थिक गणित बसत नाही. त्यामुळे इतक्या लांबीचा समुद्रकिनारा स्वच्छ करणे नगरपंचायतीच्या आवाक्याबाहेरचे आहे.
काही पर्यटन व्यावसायिकांनी कचरा जाळून टाकला आहे. परंतु कचऱ्यातील ऑईल सुकलेले, डांबरासारखे घट्ट आणि चिकट असल्याने हाताला, कपड्यांना चिकटते. त्यामुळे तांत्रिक उपकरणांद्वारे स्वतंत्र आर्थिक व्यवस्थेमधून गुहागरचा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील कचऱ्याची समस्या शासनाच्या कोणत्या विभागाने करायची हा प्रश्र्न आहे.
www.konkantoday.com