फ़िनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फ़ाऊंडेशन तर्फ़े आशादीप तसेच अनुसया आनंदी महिला वृद्धाश्रमाला देणगी देऊन तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून स्मरण दिन साजरा करण्यात आला.
दरवर्षी मुकुल माधव विद्यालयामध्ये 26 जुलै हा दिवस मेमोरियल डे अर्थात स्मरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन तर्फे या वर्षीदेखील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीतील मतिमंद मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या आशादीप संस्थेमध्ये त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या पेडेस्टल फॅन व किचन शेगडी या वस्तू मदत म्हणून प्रदान करण्यात आल्या. दरवर्षी मुकुल माधव विद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फ़त धान्य गोळा करून ‘एक मुठ्ठी अनाज की’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येतो. परंतु, कोरोनाच्या महामारीमुळे सध्या शाळा बंद असल्यामुळे मुकुल माधव फ़ाऊंडेशनतर्फ़े ‘आशादीप’ साठी आवश्यक वस्तू फ़ाऊंडेशनतर्फ़े प्रदान करण्यात आल्या.
याच दिवशी मुकुल माधव विद्यालय व फिनोलेक्स इंडस्ट्रीज परिसरात मुकुल माधव विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . कोरोनाचे संकट आल्यानंतर पर्यावरणाचे रक्षण करणे ही खूप मोठी जबाबदारी असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये देखील जागरुकता निर्माण व्हावी यासाठी वृक्षारोपण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुकुल माधव विदयालयातर्फ़े गेल्यावर्षीदेखील झाडांना विद्यार्थ्यांची नावे देण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. पर्यावरण संरक्षणाबरोबरच शाळेशी अतूट नाते निर्माण झाल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली.
यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पावस येथील अनुसया आनंदी महिला वृद्धाश्रमाला मुकुल माधव विद्यालयाच्या स्थापना दिवसाचे औचित्य सादून जून 2020 पासून मासिक धान्य वाटप देऊन सहकार्य देण्यास सुरूवात करण्यात आली. स्मरण दिनाचे औचित्य साधून वृद्धाश्रमाला किराणा मालाचे यावेळी वाटप करण्यात आले. आश्रमामध्ये 60 ते 96 या वयोगटातील 13 महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
कार्यक्रमावेळी, मुकुल माधव विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. प्रशांत होमकर, विद्यार्थी, पालक तसेच, फ़िनोलेक्स इंडस्ट्रीजचे पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात आले.
या सर्व उपक्रमाबद्दल आशादीप संस्था, शाळेतील पालक वर्ग व आश्रमातील व्यवस्थापक व महिलांनी फ़िनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन चे मनःपूर्वक आभार मानले.
हा संपूर्ण कार्यक्रम मुकुल माधव फ़ाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विरित्या संपन्न झाला.