‘रससिद्ध’ हरपले!
जवळपास एक तप होऊन गेलं तरी आजही ती रात्र माझ्या मनात ताजी आहे. रत्नागिरीच्या एका ज्येष्ठ वैद्यांना आमच्या महाविद्यालयात व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलं होतं. व्याख्यान झाल्यावर त्यांच्या राहण्याची सोय आमचे मित्र वैद्य आदित्य बर्वे यांच्या घरी केली होती. रात्रीचं जेवण आटपून आम्ही सगळे झोपण्यासाठी निघालो तेव्हा वैद्यराज म्हणाले; थोडा वेळ बोलत बसूया. रात्री १० ते पहाटे ३.३० हा ‘थोडा वेळ’ कसा गेला हे कळलंदेखील नाही. वैद्यराज भरभरून बोलत होते, आपले अनुभव कोणताही आडपडदा न ठेवता सांगत होते. एक गोष्ट सातत्याने जाणवत होती……आयुर्वेदाबाबत असलेली आत्यंतिक तळमळ! त्याविरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध बोलताना वेळप्रसंगी एखादी शिवी सहज त्यांच्या मुखातून बाहेर पडत होती; तीदेखील त्याच तळमळीतून. वैद्यराज रघुवीर भिडे; ज्येष्ठ रसशास्त्री…..सोमलासारखं अवघड द्रव्यही लीलया वापरणारे सिद्धहस्त वैद्य.
प्रत्यक्ष त्यांच्याकडून शिकण्याचा योग नसला तरी इतक्या वर्षांत सर सातत्याने प्रेरणास्थान होते. रत्नागिरीतील वैद्यांसाठी भीष्म पितामहांच्या जागी सर होते असे म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यांच्याशी अधूनमधून फोनवर बोलणं व्हायचं. दोन वर्षांपूर्वी सरांना ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सेमिनारमध्ये मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केलं होतं. तेव्हाही भरभरून बोलले. अगदी नुकतंच मला रत्नागिरी आयुर्वेद व्यासपीठाने सेमिनारमध्ये बोलण्यासाठी निमंत्रण दिलं होतं तेव्हा संपूर्ण व्याख्यान ऐकण्यास सर होते. माझ्यासाठी भाग्याचा क्षण होता! दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांचा फोन आला. “लिहिणारे आणि बोलणारे काम करत नाहीत असा एक समज असतो. माझाही होता. परीक्षित छान लिहितो, उत्तम बोलतो. पण वैद्य म्हणून काम कसं आहे? काल तुला ऐकलं आणि प्रश्नाचं उत्तर मिळालं. विषय मांडताना तू ज्या खोलात जाऊन मांडलास आणि ज्या केसेस मांडल्यास ते एका प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्याचं बोलणं होतं. माझा गैरसमज दूर झाला हे सांगण्याकरता फोन केला.” किती जणांत हा प्रांजळपणा असतो? या लहानसहान वाटणाऱ्या गोष्टी खूप मोठे धडे देत असतात. सर सडेतोड होते प्रत्येक बाबतीत. ‘होते’ हा शब्द लिहिणं जड जातंय. मात्र आज सकाळीच वैद्य पराग दाते यांच्याकडून वाईट बातमी कळली. सर रुग्णालयात होते याची कल्पना होती; बाहेर येतील याची खात्री वाटत होती. पण…आमचं दुर्दैव!
केवळ रत्नागिरीच नव्हे; संपूर्ण आयुर्वेद क्षेत्रासाठी ही खूप मोठी हानी आहे. एक नक्की सांगतो; अशा कर्मयोग्यांच्या एक्झिटनंतर अश्रू ढाळायचे नसतात. त्यांचा वारसा पुढे चालवायचा असतो. त्यांच्या विद्यार्थ्यांचं हेच कर्तव्य असेल. कोविड चिकित्सेत आयुर्वेदाला मान्यता मिळावी म्हणून खटपट करण्यात ते कुठेही मागे नव्हते. अगदी आयुष मंत्र्यांना फोन-पत्र हे सारे सोपस्कार करण्यात ते आघाडीवर होते. यासंबंधाने फोनवर चर्चा करताना काही अवस्थानुरूप आत्यायिक चिकित्सेतील कल्पही त्यांनी सुचवले होते. आत्यायिक अवस्थेतील केसेस आज आयुर्वेदाकडे येऊ लागल्या आहेत. अवस्थाविशेष असता सरांचा आशीर्वाद लाभलेले हे कल्प आम्ही जरूर वापरू. तीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. बाकी; त्यांना सद्गती लाभणार यात आम्हाला शंका नाहीच. एक ‘रससिद्ध रत्न’ हरपल्याचं अतोनात दुःख आहे. पण त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्याच तळमळीने आम्ही सगळे वैद्य कार्य करत राहू.
श्रीराम।
- वैद्य परीक्षित शेवडे