
रत्नागिरी जिल्हा अधिवक्ता परिषदेतर्फे रणजित राजेशिर्के यांचा सन्मान
महापुरात जीव धोक्यात घालून एसटी आगारातील साडेसात लाखांची रोख रक्कम वाचवण्यासाठी कर्तव्यदक्षता दाखवणारे आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांच्या कार्याची दखल घेत रत्नागिरी जिल्हा अधिवक्ता परिषदेने त्यांचा सत्कार केला. आज सकाळी अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये व पदाधिकाऱ्यांनी राजेशिर्के यांचा चिपळूण आगारात जाऊन शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन कौतुक केले.
अधिवक्ता परिषदेतर्फे राजेशिर्के यांचा सत्कार करताना अधिवक्ता परिषदेच्या उपाध्यक्ष अॅड. प्रिया लोवलेकर, चिटणीस अॅड. संदेश शहाणे, कोषाध्यक्ष ऋषिकेश कवितके व अॅड. मिलिंद तांबे उपस्थित होते. या वेळी राजेशिर्के यांनी पुराची भीषण परिस्थिती सांगितली.
यानंतर अधिवक्ता परिषदेने चिपळूण बार असोसिएशनला भेट दिली. चिपळूण जिल्हा व दिवाणी न्यायालयामध्ये सहकारी वकिलांची आस्थेने विचारपूस केली. बार असोसिएशनमध्ये सुमारे ६४ वकील असून त्यापैकी सुमारे ४३ वकिलांचे कार्यालय, घर यांचे भरपूर नुकसान झाले आहे. पूर आलेल्या ठिकाणीच वकिलांची कार्यालये आहेत. त्यामुळे ती सर्व कार्यालये पाण्यात होती. कार्यालयातील वकिलीविषयक दस्तावेज, निकालपत्रे, लाखो रुपयांची संदर्भ पुस्तके पाण्यात भिजून वाया गेली. याबाबत अॅड. भाऊ शेट्ये यांनी माहिती जाणून घेतली. सर्व वकील सहकाऱ्यांचे दुःख जाणून घेतले.
अधिवक्ता परिषदेतर्फे पूरग्रस्त वकिलांची आस्थेने विचारपूस केली. तसेच नुकसान भरपाई, विम्यासंदर्भात चर्चा झाली. वकिलांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले आहे. घरातील साहित्याचेही नुकसान झाले असून आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पूरग्रस्तांची वकिलांची यादी घेतली असून त्यांची प्रत्येकाची माहिती घेण्यात आली आहे. वरिष्ठ व कनिष्ठ वकिलांना मदतीची गरज आहे, त्यांची माहिती मागवली आहे. वकिलांच्या तसेच जनसामान्यांना विमा क्लेमसाठी अडचणी साठी अधिवक्ता परिषदेमार्फत उच्च न्यायालयातील तज्ञ वकिलांची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
www.konkantoday.com




