लॉकडाऊनचा सदुपयोग, वाडीतच भरते २ तास शाळा
सावर्डे, दि. २३ : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पसार झपाट्याने होत आहे. यातच लॉकडाऊन मुळे अनेक उद्योग-धंदे ठप्प आहेतच, पण शाळा, कॉलेज देखील बंद आहेत. शासनाने काही ठिकाणी ई-लर्निंग सुरु केले आहे. परंतु गाव खेड्यात ई-लर्निग साठी आवश्यक साधन सामग्री इंटरनेट उपलब्ध असेलच असे नाही.
लॉकडाऊनचा कालावधी फुकट जाऊ नये आणि शाळकरी मुलं अभ्यासापासून लांब जाऊ नये म्हणून काही गावात ग्रामस्थांकडून शैक्षणिक उपक्रम राबवताना दिसत आहेत.
चिपळूण तालुक्यातील कुटगिरी पुनर्वसन येथील मुलांसाठी दररोज २ तास शाळा हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गावातील लहान मुलांसाठी रोज २ तास शाळा भरवली जाते. इयत्ता पहिली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचा यात प्रमुख्याने समावेश आहे. वाडीतील मुले यात आनंदाने सहभाग घेत आहेत. वाडितील समाज मंदिरात ही अनोखी शाळा भरवेली जाते.
लॉकडाऊनमुळे मुंबईतून गावात आलेल्या मुलांनी हा प्रस्थाव येथील भावकी संघटनेमध्ये ठेवला आणि तत्काळ एकमत होऊन या उपक्रमाला सुरवात झाली. या २ तासांच्या शाळेत मराठी, गणित, इंग्लिश या प्रमुख विषयांसोबतच इतर विषय हि शिकवण्यात येत असून यावर प्रश्नकाढून ते सोडवायला देखील दिले जात आहेत.
शाळेतील मुलांचा अभ्यास घेण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साक्षी कदम, नंदिनी कदम, श्रेया कदम, आशिष कदम, प्रतिमा कदम, पंकज कदम, अदिती कदम, हृषीकेश कदम, वैष्णवी कदम ई. वाडीतली मूलं पुढाकार घेत आहेत.