लॉकडाऊन गेला खड्ड्यात, जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्हाला लॉकडाऊन नको, ठरवता का बोला,– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यातील वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत भाष्य करतानाच मिशन बिगिन अगेनच्या पुढील टप्प्याबाबतही महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. तसेच लॉकडाऊन उठवा, यावरील निर्बंध शिथिल करा, ते उघडा असे सल्ले देणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीमधून टोला लगावला आहेलॉकडाऊन हटवा म्हणणारे लोकांच्या जीविताची जबाबदारी घेणार आहेत का? असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना हे जागतिक संकट आहे. ही वेळ केवळ आपल्यावरच आलेली नाही. या संकटावर नेमकेपणाने बोलणारे किंवा सल्ला देणारे जगात कुणी नाही. एकीकडे लॉकडाऊनला विरोध करणारे शहाणे आहेत. लॉकडाऊनमुळे काय साधले, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर संकट आले आहे, असा दावा केला जात आहे. मी लॉकडाऊन उघडून देतो. पण इथे लोक मृत्युमुखी पडले तर तुम्ही त्याची जबाबदारी घेणार का. आज जे दार उघडा म्हणून सरकारदरबारी बसलेत टाहो फोडताहेत, त्यांच्यासाठी दारे उघडायला हरकत नाही. पण दारं उघडल्यानंतर तुम्ही जबाबदारी घेणार का, अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटाची जाणीव आम्हालाही आहेच.
आपण मिशन बिगीन अगेन करताना ते नीट समजावून घेतले पाहिजे. लॉकडाऊन केलेला आहेच. मात्र आपण त्यातून एकएक गोष्ट सोडवत चाललो आहोत. हळूहळू शिथिल करतोय. नाहीतर लॉकडाऊन वन, लॉकडाऊन टू आणि अनलॉक टूमध्येच आपण अडकून पडू. तुम्ही घाईघाईने लॉकडाऊन केला तर ते चुकीचे आहे. तसेच घाईघाईने अनलॉक केला तर तेही चुकीचे ठरेल. लॉकडाऊनला लोक कंटाळले आहेत. पोटापाण्याचा प्र्श्न आहे हे खरेच आहे. मात्र त्यासाठी घाईगडबडीने एकदम सर्व काही उघडले आणि साथ प्रचंड वाढली, त्यात लोकांचा जीव गेला तर पोटापाण्याचं काय करणार, कारखान्यांमध्ये ही साथ घुसली तर काय होणार. लोकं मरतील तेवढी मरू दे, लॉकडाऊन नको, असं करायला तुमची तयारी आहे का? असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
कोरोनाबाबत अमेरिकेने जे केलंय ते करण्याची माझी तयारी नाही. मी म्हणजे काही ट्रम्प नाही. लोकांना डोळ्यांपुढे तडफडताना मी बघू शकत नाही. त्यामुळे एक गोष्ट ठरवा, लॉकडाऊन गेला खड्ड्यात, जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्हाला लॉकडाऊन नको, ठरवता का बोला, अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली
www.konkantoday.com