
नाणार जाणार की राहणार यात कोकणची पाच वर्षे बरबाद झाली-गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे
नाणार येथील रिफायनरी हा आता केवळ राजकीय विषय झाला आहे. त्यापेक्षा प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी विकसित व्हायला हव्यात, अशी भूमिका रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने स्पष्ट केली आहे.
नाणारच्या नावाने केवळ राजकारण सुरू असून रिफायनरी रद्द करणारेच आता ती पाहिजे असे सांगत आहेत. सत्ता असताना प्रकल्प रद्द केला, मग आता तोच विषय पुन्हा का? नाणार जाणार की राहणार यात कोकणची पाच वर्षे बरबाद झाली, अशी टीका गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केली आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी नाणारचे राजकीय भांडवल केले जात आहे. तेव्हा केंद्रात भाजपचे सरकार होते आणि राज्यातही भाजप सत्तेत होती.असे असताना आता भाजपचे जे लोक प्रकल्प हवा, म्हणून भूमिका घेत आहेत, त्यांनी नाणार रद्द का केला, याचे उत्तर कोकणवासीयांना द्यायला हवे. दुसरीकडे नाणार रद्द झाल्याचे श्रेय घेणाऱ्यांनीसुद्धा स्थानिकांची मागणी असल्यास विचार करू, असा संभ्रम निर्माण का करावा, हाही प्रश्नच आहे. त्यामुळे नाणार हा विषय आता पूर्णतः राजकीय झाला असून तो कोकणातील तरुणांच्या रोजगाराचा विषय राहिला नाही, असेही खंडागळे यांनी म्हटले आहे.
कोकणात तालुकानिहाय ज्या एमआयडीसी आहेत, त्याठिकाणी उद्योग-व्यवसाय कसे येतील, यासाठी त्या त्या भागातील तरुणांनी आपल्या लोकप्रतिनिधींमार्फत पाठपुरावा करायला हवा, असेही श्री. खंडागळे यांनी नमूद केले आहे.
www.konkantoday.com